सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आमदारकीचा उपयोग करणार - आमदार राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

17 November 2019

सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आमदारकीचा उपयोग करणार - आमदार राजेश पाटील

कोवाड येथे किणी -कर्यात भागातील कार्यकर्त्यांच्या वतीने सपत्नीक सत्कार
कोवाड (ता. चंदगड) येथे  किणी -कर्यात भागातील ग्रामस्थांच्या वतीने राजेश पाटील यांचा सत्कार करताना सुरेशराव चव्हाण - पाटील सोबत सौ . सुस्मिता पाटील
कोवाड / प्रतिनिधी 
कोवाड ही माझी कर्मभूमी आहे . या किणी कर्यात भागातील असंख्य लोकानी माझ्या विजयासाठी परिश्रम घेतले आहेत .मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला पात्र राहून याच सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आमदासकीचा वापर करणार असल्याचे प्रतिपादन चंदगड मतदार संघाचे नूतन आमदार राजेश नरसिंगराव पाटील यानी केले. कोवाड (ता. चंदगड) येथे किणी-कर्यात ) विभागातील राष्ट्वादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आय. पी. आय. शेतकरी कामगार पक्ष, जनता दल व मित्र पक्षाच्या वतीने राजेश पाटील यांचा सपत्नीक सत्कार  सुरेशराव चव्हाण - पाटील यांच्या हस्ते करण्यात  आला. यावेळी आमदार पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी बाळासाहेब कोकीतकर होते.
आमदार राजेश पाटील यांना मानपत्र देवून सन्मान करताना कार्यकर्ते. 
श्री. पाटील पुढे म्हणाले,``चंदगड तालुक्यात येऊ पाहणाऱ्या `नोट फॉर व्होट` या वेगळ्या संस्कृतीला येथील मतदारांनी लगाम लावला आहे. कोणतीही कामे न करता केवळ नोटा वापरून मते मिळवणारे उमेदवार विकास काय करणार? मतदारसंघातील मुलभूत प्रश्न सोडवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. मतदारसंघात हत्ती, गवे यांचा शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतीचे पंचनामे झाले नसल्याने तशी विनंती तहसिलदार यांचेकडे केली आहे. मतदार संघात युवकांसांठी मोठे उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आज या भागातील मतदारांनी माझा मानपत्र देवून केलेला भव्य सत्कार अविस्मरणीय आहे. यामुळे माझी जबाबदारी वाढली असून जिथे अडेल, जिथे नडेल तेथे आमदार म्हणून राजेश पाटील ठामपणे उभा राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
पी .एस. नौकूडकर यांनी प्रास्ताविक केले. कैं. नरसिंगराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. मानपत्राचे वाचन अश्विनी पाटील यांनी केले. नरसिंह हायस्कूलच्या मुलांनी स्वागतगीत सादर केले.  आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्धल रविंद्र देसाई यांचा आमदार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राजेश पाटील यांचा कोवाड परिसरातील सर्व ग्रामपंचायती, विविध संस्था, शिक्षक, चंदगड तालुका पत्रकार संघटना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रा. दिपक पाटील, प्रा. सुखदेव शहापूरकर, विष्णू आढाव, वसंत जोशीलकर, श्रीमंता सलाम, सौ. सु्स्मिता पाटील, जानबा पाटील, मयूरी जाधव, रविंद्र देसाई यांनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाला अभय देसाई, भिकू गावडे, चंद्रकांत कुंभार, नारायण कणुकले यांच्यासह गडहिंग्लज, आजरा, चंदगड व बेळगाव जिल्हयातील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. मायाप्पा पाटील यांनी सुत्रसंचालन केले. सुर्यकांत पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment