चंदगड नगरपंचायतीसाठी महाविकास आघाडीची स्थापना, आघाडीच्या सर्व 18 उमेदवारांची यादी जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

12 December 2019

चंदगड नगरपंचायतीसाठी महाविकास आघाडीची स्थापना, आघाडीच्या सर्व 18 उमेदवारांची यादी जाहीर

पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहीती
चंदगड नगरपंचायतीसाठी महाविकास आघाडी स्थापन केल्याची माहीती देताना आमदार राजेश पाटील. 
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड नगरपंचायतीसाठी आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या वतीने एकत्र येत राज्यात ज्याप्रमाणे महायुती आहे. त्याप्रमाणे चंदगड नगरपंचायतीमध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र येवून महाविकास आघाडी स्थापन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्राची दयानंद काणेकर यांची नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीतून निवड केल्याची माहीती आमदार राजेश पाटील, शिवसेनेचे संघटक संग्राम कुपेकर यांनी चंदगड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 
आमदार राजेश पाटील म्हणाले, ``सर्व इच्छुकांना या निवडणुकीत न्याय देता आला नाही. पण संयम पाळा, सब्र का फल मिठा होता है. हे आपले उदाहरण देवून सांगितले. कोणावरही व्यक्तीगत पातळीवर टिका न करता विकासाच्या मुद्दयावर बोला. चंदगडची नगरपंचायत आदर्शन नगरपंचायत बनवू. यासाठी चंदगड नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.`` 
संग्राम कुपेकर म्हणाले, ``इच्छुकांनी महाविकास आघाडीतून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र सर्वांनाच उमेदवार देणे शक्य नाही. त्यामुळे इच्छुक असलेल्या नाराजांची समजूत काढावी लागणार आहे. छाननीनंतर नारळ वाढवून प्रचार शुभारंभ केला जाणार आहे.`` 
गडहिंग्लज पंचायत समितीचे उपसभापती विद्याधर गुरबे यांनी नगरपंचायत मंजूर झाली हे श्रेय कोणीही घेवू नये. हा चंदगडकरांच्या एकजुटीचे विजय असल्याचे सांगितले. त्यामुळे सर्वांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना साथ देण्याचे आवाहन केले. 
शिवनंद हुंबरवाडी म्हणाले, ``नगरपंचायतीसाठी निवडून आलेल्या उमेदवारांनी लोकाभिमुख कारभार केला पाहिजे. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी वेळ दिला पाहिजे. कारभार पारदर्शक झाला पाहिजे. कामानिमित्त बाहेरगावाहून आलेल्या लोकांना चंदगडमध्ये सर्व सोयी मिळाल्या पाहिजेत. नगरपंचायतीसाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून विचारांची आघाडी बांधली असून सर्वांनी त्याचे पालन करण्याची गरज आहे.`` यावेळी अरुण पिळणकर, फिरोज मुल्ला, प्रवीण वाटंगी, राजेंद्र परीट, अभय देसाई यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार व प्रमुख उपस्थित होते. पंचायत समिती सदस्य दयानंद काणेकर यांनी आभार मानले. 
चंदगड नगरपंचायत निवडणुकीसाठी आज शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस या सर्वांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करून निवडणुकीसाठी सामोरे जाण्याचे ठरविले आहे. यामध्ये शिवसेनेसाठी 6 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस 6 व राष्ट्रीय काँग्रेस 5 व नगराध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले.

शिवसेनेचे उमेदवार – झाकीरहुसेन नाईक (वार्ड क्र. 6), नेत्रदिपा कांबळे (वार्ड क्र. 7), गजानन पिळणकर (वार्ड क्र. 11), फिरोज मुल्ला (वार्ड क्र. 12), संजीवनी देसाई (वार्ड क्र. 16), माधुरी कुंभार (वार्ड क्र. 13).

काँग्रेसचे उमेदवार – अभिजित गुरबे (वार्ड क्र. 1), सुधीर पिळणकर (वार्ड क्र. 2), सल्लाऊद्दीन नाईकवाडी (वार्ड क्र. 5), सौ. अनुसया दाणी (वार्ड क्र. 9), सोनिया रजपूत (वार्ड क्र. 10).

राष्ट्रवादीचे उमेदवार – शाहिदा नेसरीकर (वार्ड क्र. 3), शगुफ्ता फनीबंद (वार्ड क्र. 4), संतोष वनकुंद्रे (वार्ड क्र. 8), रोहीत वाटंगी (वार्ड क्र. 14), संजवनी चंदगडकर (वार्ड क्र. 15), सुवर्णा गुळामकर (वार्ड क्र. 17).

No comments:

Post a Comment