कोवाड येथे वाढीव विजबिले व मीटर बाबत शेतकऱ्यांचा वीज कार्यालयावर मोर्चा, आश्वासनानंतर आंदोलन मागे - चंदगड लाईव्ह न्युज

06 December 2019

कोवाड येथे वाढीव विजबिले व मीटर बाबत शेतकऱ्यांचा वीज कार्यालयावर मोर्चा, आश्वासनानंतर आंदोलन मागे

कोवाड येथील वीज कार्यालयात वीज कंपनीचे उपअभियंता विशाल लॉबी यांच्याशी चर्चा करताना शेतकरी.
कोवाड / प्रतिनिधी
कृषी पंपांची वाढीव आलेली वीज बिले व महापुरात बुडालेल्या मीटर पेट्यांची नुकसानभरपाई मिळावी, वीज पुरवठा तात्काळ सुरू करावा या मागणीसाठी आज कोवाड परिसरातील कृषिपंप धारकांनी महावितरणवर मोर्चा काढला. वाढीव बिलाबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरून शेतकऱ्यांनी जाब विचारला. यावेळी वीज कंपनीचे उपअभियंता विशाल लोधी यांनी कृषी पंपांची वाढीव आलेली बिले दुरुस्त करून देण्यासह नवीन मीटर तात्काळ उपलब्ध करून देण्याचे व वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
पंधरा दिवसात महावितरणने मागण्यांची पूर्तता केली नाही तर मोठ्या जनआंदोलन ऊभे करण्याचा इशारा दिला आहे. उपअभियंता श्री. लोधी यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या वरिष्ठांना कळविण्याचे सांगितले. सध्या मीटर नसल्याने अडचण असून मीटरच्या उपलब्धेनुसार मीटरचा पुरवठा करून शेतकऱ्यांची अडचण दूर करू. येणाऱ्या बिलातून सध्या आलेली वाढीव बिले दुरुस्त करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महापुरानंतर दोन महिन्यांचा कालावधी झाला तरीही अद्याप महावितरणने कृषिपंप धारकांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. शेतकरी सतत वीज कार्यालयात जाऊन मीटरची मागणी करत आहेत. पण महावितरणकडून त्याची दखल घेतली जात नाही. याउलट महापुराच्या काळातील वाढीव वीज बिले पाठवल्याने संतप्त झालेल्या कृषी पंप धारकांनी आज येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढून सर्वांचे लक्ष वेधले.
उपअभियंता श्री. लोधी यांच्याकडे शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडून वीज कंपनीच्या कारभाराचा पाढा वाचला. वीज कार्यालयातून ग्राहकांना तात्काळ सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या. जनार्धन देसाई यांनी वीज कंपनीचे कर्मचारी कामाची वेळेवर दखल घेत नसल्याचे सांगून ज्या गावात कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा आदेश आहे. त्याच गावात तो कर्मचारी राहिला पाहिजे अशी मागणी केली. महापुराच्या काळात कृषी पंप सहा मीटर पाण्यात बुडाली आहेत. जून पासून नोव्हेंबरपर्यंत वीज पुरवठा बंद आहे असे असताना शेतकऱ्यांना वाढव बिले आलीच कशी? असा प्रश्न नरसिंग बाचुळकर यांनी उपस्थित केला. महापुरात कृषीपंपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने महावितरणने शेतकऱ्यांची वीज बिले पूर्णता माफ करावीत अशी मागणी संजय कुट्रे यांनी केली. श्री. लोधी यांनी शेतकऱ्यांचे गाऱ्हाने समजून घेतल्यानंतर पंधरा दिवसात मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. पूर कालावधीत मीटर पाण्यात बुडाली असल्याने सरासरी बिलांची आकारणी झालेली आहे. याबाबत चर्चा करून ही बिले शून्य किंवा एक तृतीअंश यापैकी जो योग्य ठरेल, त्याप्रमाणे दिली जातील,  पाण्यात बुडालेली मीटर आम्ही बदलून देणार आहोत. यासाठी मीटरची मागणी केली आहे. मीटर उपलब्ध होत असतील तशी तात्काळ देण्याचे काम करू असे सांगितले. याशिवाय श्री. लोधी यांनी व्यक्तिगत तक्रारींचे निवेदन केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
निट्टुरचे माजी उपसरपंच कृष्णकांत साळुंखे यांनी शेतीकामाची आता घाई सुरू आहे. पिकांना पाण्याची गरज आहे. पण मीटर नसल्याने कृषिपंप सुरू होऊ शकत नाहीत. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने तात्पुरता वीज पुरवठा सुरळीत करून शेतकऱ्यांची अडचण दूर करावी अशी मागणी केली. यावेळी सहाय्यक अभियंता अजित कांबळे, वर्षा पवार यांच्यासह उपसरपंच विष्णू आढाव, प्रकाश पुजारी, चंद्रशेखर देसाई, यलाप्पा पाटील, गावडू पाटील शिवाजी पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नियंत्रणाखाली मोर्चाला पोलीस बंदोबस्त होता.


No comments:

Post a Comment