![]() |
हलकर्णी येथील दौलत कारखाना. (संग्रहित छायाचित्र) |
दौलत सहकारी साखर कारखाना संचलित अथर्व इंटर ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड, कोल्हापूर या कारखान्यास आज अखेर गळीतास आलेल्या उसास २६०० रुपये पहिला हप्ता जाहीर करण्यात आला आहे. सोमवारपासून संबंधित ऊस उत्पादकांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे. राज्य शासनाच्या शेती कर्जमाफी मुळे कुणाही शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये. शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहू नये. म्हणून ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी पर्यंत उसाचे बिल नको असेल, त्यांनी लेखी स्वरूपात कारखान्याकडे त्वरित अर्ज करावेत असे आवाहन अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी केले आहे. हलकर्णी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
![]() |
मानसिंग खोराटे |
ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी साखर उताऱ्या नुसार दर निश्चित केला आहे. गतवर्षी दौलत बंद होता. यापूर्वी २०१६-१७ मध्ये गाळप झालेल्या दौलत चा साखर उतारा १०.९० टक्के होता. यानुसार दर दिल्यास तो २३२२ रुपये होतो. मात्र शेजारच्या इतर कारखान्या प्रमाणे दौलतचा दर असेल हे यापूर्वीच आम्ही जाहीर केले आहे. साखर उतारा किती असणार यावर ऊस दर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दौलत वर विश्वास ठेवावा. आपला सर्व ऊस दौलत ला गाळपासाठी पाठवावा. आज अखेर ३८ हजार टन उसाचे गाळप झाले असून, सरासरी साखर उतारा १० टक्के पर्यंत आहे. दौलत चा वजन काटा तंतोतंत आहे. शेतकऱ्यांनी वजन काट्यावर व दौलत वर विश्वास ठेवावा. शेतकर्यांनी सगळ्याच बाबतीत चौकस राहिले पाहिजेत. शेतकऱ्यांच्या व्यथा मला माहित आहेत. मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे. कष्ट काय आहेत याची मला कल्पना आहे. त्यामुळे मी कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची लुबाडणूक होऊ देणार नाही. अथर्व ने दिलेल्या या दराने एकरी उत्पन्नामध्ये इतरांच्या तुलनेत वाढत होणार हे निश्चित आहे.
सद्या 6००० टन ऊस तोड करू शकेल इतकी यंत्रणा कारखान्याकडे आहे. कारखान्याचा वाहतूक खर्च इतर कारखान्यांच्या तुलनेत कमी आहे. ४२०० टन प्रतिदिनी इतके गाळप करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे येत्या कालावधीत चार पैसे शेतकऱ्यांच्या पदरात जास्त पडणार आहेत. यापुढे बंद असलेली डिस्टिलरी सुरू करण्यात येणार असून इथेनॉल प्रकल्प गाळप क्षमतेत वाढ करणे ही दोन उद्दिष्टे आहेत. त्यांची पूर्तता करून भविष्यात या विभागात सर्वात जास्त ऊस दर देण्यासाठी दौलत बांधील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी अथर्व चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश चिटणीस, शेती अधिकारी पी जी पाटील, प्रशासन अधिकारी व्ही के ज्योती आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मानसिंग खोराटे म्हणाले, दौलत चा वजन काटा खुला आहे, कुठूनही वजन करून ऊस कारखान्याकडे घेऊन यावा. चुकीचे वजन किंवा कमी वजन दाखविल्यास त्याच वजना इतका ऊस संबंधित शेतकऱ्याला बक्षिस म्हणून देण्यात येईल.
No comments:
Post a Comment