सरसकट कर्जमाफीसाठी नांदवडे सेवा संस्थेला टाळे, कर्जमाफीपर्यंत शेतकऱ्यांचा कर्ज न भरण्याचा निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

26 December 2019

सरसकट कर्जमाफीसाठी नांदवडे सेवा संस्थेला टाळे, कर्जमाफीपर्यंत शेतकऱ्यांचा कर्ज न भरण्याचा निर्णय

सरकार शेतकऱ्यांना जोपर्यंत  सरसकट कर्जमाफी देत नाही तोपर्यंत सेवासंस्थेचे कार्यालय बंद ठेवावे, या मागणीसाठी नांदवडे येथील शेतकऱ्यांनी सेवा संस्थेला टाळे ठोकले. 
चंदगड / प्रतिनिधी
राज्यातील महाआघाडीच्या सरकारने कर्ज माफीचा घेतलेला निर्णय चुकीचा असून या निर्णयामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय होणार  आहे. जोपर्यंत सरसकट कर्ज माफी होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी बँकेचे अथवा सोसायट्यांचे कर्ज भरणार नसल्याचा पवित्रा घेत नांदवडे (ता. चंदगड येथील शेतकऱ्यांनी माऊली सेवा सोसायटीला टाळे ठोकले. कर्ज वसुलीसाठी बँक अधिकाऱ्यांनी तगादा लावल्यास त्याना कर्ज वसुली महागात पडेल असा इशारा अॅड.  संतोष मळविकर यांनी दिला आहे.
संस्थाध्यक्ष विठोबा गावडे  म्हणाले  ``आताच्या सरकारकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र त्यांनीही नेहमीच कर्ज पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. सरकारने तात्काळ त्यावर तोडगा काढून सरसकट कर्जमाफी करून नेहमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा.`` 
जे. जी. पाटील यांनी येत्या काही दिवसात सरसकट कर्ज माफीचा निर्णय नाही झाला तर शेतकऱ्यांनी बँकांचे अथवा सोसायटी चे कर्ज भरू नये, असा प्रस्ताव ग्रामस्थांन समोर मांडला. यावेळी दौलतचे संचालक बाबुराव पाटील यांनी  ग्रामस्थांच्या वतीने एकमुखी अनुमोदन दिले. शासना समोर आपला आवाज पोहचवावा म्हणून दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली सेवा सोसायटीला टाळे ठोकण्यात आले. अध्यक्ष विठोबा गावडे यांना कार्यालय बंद करण्यासाठी निवेदन देऊन शेतकऱ्यांचा एकही पैसा कर्जावर ओढून घेऊ नये अशी विनंती केली. यावेळी यशवंत पाटील. संभाजी मळविकर, महादेव कूट्रे, राजेंद्र बुवा, भैरू गावडे,  नारायण गावडे, विठोबा शिंदे, धोंडीबा गावडे, नारायण पाटील, विजय गावडे, सीताराम कांबळे, पांडुरंग गावडे, मारुती शिंदे, शंकर पाटील, अनिल गावडे, परशराम पाटील व शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment