कारखान्यांनी महापुराने बाधिक क्षेत्रातील ऊसाची उचल प्राधान्याने करावी, शेतकऱ्यांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

29 December 2019

कारखान्यांनी महापुराने बाधिक क्षेत्रातील ऊसाची उचल प्राधान्याने करावी, शेतकऱ्यांची मागणी

कोवाड : नदीकाठावरील पूरबाधित ऊस असा उभा आहे.
अशोक पाटील / कोवाड
अतिवृष्टीमुळे यावर्षी उशिरा साखर कारखाने सुरु झाले असले तरी ऊस तोडणी कामाला वेग आला आहे . सर्वच कारखान्यानी तोडणी यंत्रणा सक्षमपणे उभी केल्याने कारखान्यांचा गळीत हंगाम जोरात सुरू आहे. पण महापूरामुळे बहुतांशी उसाचे क्षेत्र पूरबाधित आहे. त्यामुळे शेतकरी पूरबाधित ऊस तोडणीसाठी घाई करत आहेत. पण तोडणी मजूरच पूरबाधित ऊसाकडे पाठ फिरवत असल्याने शेतकरी धर्मसंकटात सापडला आहे. कारखाना प्रशासनानी पूरबाधित ऊस उचल करण्यावर भर यावा, अशी मागणी चंदगड मधील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्यातून होत आहे .
ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापूराचा शेती पिकाला मोठा फटका बसला. विशेषतः ऊस व भात पिकांचे तर फार नुकसान झाले. चंदगड तालुक्यात ताम्रपर्णी नदीला महापूर आला. यामध्ये हजारो हेक्टर ऊस शेती पाण्याखाली गेली. महापूरात ऊस बुडाल्याने ऊसाची वाढ खुंटली आहे. पाण्यात मुळं कुजल्याने ऊस वाळला आहे. काही ठिकाणी तर तुरे आले आहेत. असा उस लवकर तोडून कारखान्याला घातला तर काही अंशी नुकसान टळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. पण सर्वच कारखान्यांचे उस तोड मजूर पूरबाधित ऊस तोडणीला टाळाटाळ करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पूरबाधित ऊसाचे वाडे सुकले आहे . ऊस पोकळ झाला आहे . असा उस तोडताना कसरत करावी लागते. यामुळे स्थानिक टोळीतील मजूर माळरानावरील उस तोडीला प्राधान्य देत आहेत. बीडचे तोडणी मजूर ऊसाचे फड पाहून तोडणी घेत आहेत.  त्यामुळे पूरबाधित ऊस तोडीचा प्रश्न शेतकऱ्यांच्यासमोर उभे राहत आहे. चंदगड तालुक्यातील सर्वच कारखान्यांनी पूरबाधित ऊस तोडीला प्राधान्य दिले असले तरी तोडणी मजूरांच्या मुजोरपणापुढे कारखाना प्रशासन हतबल होताना दिसते आहे. पूरबाधित ऊस लवकर तुटला नाही तर शेतकऱ्यांच्यासमोर शेतीच्या मशागतीचे नवे संकट उभे राहणार आहे. त्यासाठी पूरग्रस्त शेतकरी कारखान्याना ऊस तोडीसाठी गळ घालत आहेत. कारखान्यांच्या शेती विभागाने यांची गांभिर्याने दखल घेऊन पूरबाधित ऊस उचल करण्यावर भर द्यावा, अशी मागणी होत आहे .
                                            ऊस पेटविण्याची वेळ येऊ नये
महापूरामुळे ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे असा ऊस लवकर तोडण्याची गरज आहे पण पूरबाधित ऊस तोडीसाठी मजूर टाळाटाळ करत आहेत. कारखान्यांनी पूरबाधित ऊस उचल करण्याचे नेटके नियोजन केले पाहिजे. अन्यथा असा ऊस पेटविण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय राहणार नाही.
कृष्णकांत साळुंखे (निटूर, शेतकरी)

No comments:

Post a Comment