कर्यात भागात कडपाल पेरणीची घाई; औतांचे भाव वधारले - चंदगड लाईव्ह न्युज

11 December 2019

कर्यात भागात कडपाल पेरणीची घाई; औतांचे भाव वधारले

कालकुंद्री शिवारात मसूर आदी रब्बी कडधान्य पेरणी करताना शेतकरी. (छाया: श्रीकांत पाटील कालकुंद्री)
कालकुंद्री / प्रतिनिधी
कर्यात भागात उत्पादित होणारे कडपाल (रब्बी हंगामातील कडधान्य पिके) पेरणीची एकच धांदल सुरू आहे. जमिनीतील ओलावा जाण्यापूर्वी पेरणी उरकणे गरजेचे असल्यामुळे शेतकरी नांगर औत धारकांचा शोध घेताना दिसत आहेत.
चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडील कालकुंद्री, कुदनुर,कागणी, दुंडगे, किणी, कोवाड, निटुर, म्हाळेवाडी, घुलेवाडी, नागरदळे आदी वीस-पंचवीस गावांचा परिसर कार्यात भाग म्हणून ओळखला जातो. येथील रब्बी हंगामातील मसूर जगप्रसिद्ध आहे. भात पीक कापल्यानंतर जमिनीतील ओलाव्यावर पेरणी केली जाणारी मसूर सह वाटाणा, हरभरा, मोहरी, गहू, शाळु ही पिके कोणते खत न वापरता घेतली जातात. या सर्व पिकांना बाजारात मोठी मागणी असूनही ऊस पिकाच्या वाढत्या क्षेत्रामुळे कडधान्य दुर्मिळ होत चालले आहेत. असे असले तरी मसूरीचा 'बाज' अद्याप टिकून आहे. सध्या पेरणीसाठी मसूर दर प्रति किलो दीडशे पर्यंत आहे. दूध व्यवसाय वाढीमुळे बैलजोडी पाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमालीची रोडावली आहे. त्यात कडपाल पेरणी औताशिवाय शक्य नसल्यामुळे व औतधारकांचा भाव मात्र वधारला आहे. पेरणीनंतर स्वच्छ हवामान व थंडीत मुळे कडपाल पिके जोमाने वाढतात. मात्र सध्या रोज बदलणारे विचित्र व ढगाळ हवामान यामुळे उगवण झालेल्या मसूर, वाटाणा पिकांवर करपा रोगांचा प्रादुर्भाव दिसत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत असून कृषी विभागातील तज्ञांनी यावर प्रतिबंधात्मक उपाय सुचवावेत अशी मागणी आहे.

No comments:

Post a Comment