मंत्रालय दररोज सुरू राहणार, सुत्रांची माहीती - चंदगड लाईव्ह न्युज

14 December 2019

मंत्रालय दररोज सुरू राहणार, सुत्रांची माहीती


मुंबई / प्रतिनिधी
मंत्रालयात  आठवड्यातील तीन-चार दिवस चालणारं  कामकाज आता दररोज सुरू राहणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईचेच असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तब्बल २५ वर्षानंतर पहिल्यांदाच दररोज मंत्रालयीन कामकाज सुरू राहणार असल्याने राज्यातील जनतेला आठवडभरात कधीही येऊन मंत्र्यांकडे त्यांची गाऱ्हाणी मांडता येणार आहे.
मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे दररोज मंत्रालयात हजर राहत आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत सहाही मंत्र्यांना मंत्रालयात हजर राहून कामकाज करावं लागत आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांनी दर बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा पायंडाही पाडला आहे. राजकीय दौरे आणि कार्यक्रम वगळता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दररोज मंत्रालयात हजर राहून कामकाज पाहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं._
काँग्रेस आघाडीच्या काळात दर बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होत असायची. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकाळात दर मंगळवारी कॅबिनेटची बैठक व्हायची. त्यामुळे मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे तीन दिवसच मुख्यमंत्री आणि मंत्री मंत्रालयात हजर असायचे. त्यामुळे इतर दिवशी मंत्रालयातील गर्दीही कमी व्हायची आणि कामकाजही संथ गतीने व्हायचे. फडणवीस हे नागपूरचे असल्याने ते सतत विदर्भाच्या दौऱ्यावर असायचे. त्यामुळे मंत्रालय ओस पडलेले असायचे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईचे आहेत. त्यामुळे ते रोज मंत्रालयात हजर राहणार असल्याने मंत्रालयातील कामाचा निपटारा वेगाने होणार असून मंत्रालयातील नागरिकांची वर्दळही वाढणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण आदी माजी मुख्यमंत्री मुंबईचे नव्हते. त्यामुळे ते मंत्रालयात सतत येऊन जाऊन असायचे. परिणामी मंत्रालयाचं कामकाज तीन ते चार दिवसचं सुरू असायचं. या उलट माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि नारायण राणे यांचं मुंबईत वास्तव्य होतं. त्यामुळे हे दोन्ही मुख्यमंत्री दररोज मंत्रालयात यायचे. आता त्याचीच पुनरावृत्ती तब्बल २५ वर्षाने होत आहे.त्यामुळे आता कामांचा आढावा व निपटारा होण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment