चंदगड नगरपंचायत, उद्याच्या माघारीकडे सर्वांचे लक्ष, माघारीनंतर होणारे लढतीचे चित्र स्पष्ट - चंदगड लाईव्ह न्युज

17 December 2019

चंदगड नगरपंचायत, उद्याच्या माघारीकडे सर्वांचे लक्ष, माघारीनंतर होणारे लढतीचे चित्र स्पष्ट


चंदगड / प्रतिनिधी
चंदगड नगरपंचायतीसाठी नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी आठ उमेदवारांचे 10 तर नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी 81 उमेदवारांचे 111 अर्ज छाननीनंतर राहिले आहेत. अर्ज माघारी घेण्याचा बुधवारी (ता. 18) शेवटचा दिवस आहे. बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. त्यामुळे सर्वांचेच या अर्ज माघारीकडे लक्ष लागून राहिले आहे. 
चंदगड नगरपंचायत चंदगड वाशियांनी केलेल्या मोठ्या संघर्षातून मंजूर झाली. नगरपंचायत पदाधिकारी होण्याचे आकर्षण असल्याने सर्वच जण पहिल्या नगगरपंचायतीचा नगराध्यक्ष व नगरसेवक होण्यासाठी कमालीचे इच्छुक आहेत. त्यामुळे चंदगड नगरपंचायतीसाठी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीमध्ये 92 उमेदवारांनी 153 अर्ज दाखल केले होते. प्रत्येक वार्डमध्ये कमालीची चुरस पहायला मिळणार आहे. आघाडीचे नेते नाराज असलेल्या उमेदवारांची मनधरणी करण्यात गुंतले आहेत. आघाडी व पक्षातून तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्यांनी अपक्ष अर्ज भरुन इतरांची डोकेदुखी वाढवली आहे. अनेकांनी पक्षातून तिकीट मिळेल या आशेवर आपला अर्ज दाखल केले होता. मात्र पक्षाकडून तिकीट नाकारल्याने एकट्याची ताकद पुरणार नसल्याने माघार घ्यावी कि कोणाला मदत करावी या मनस्थितीत काही उमेदवार आहेत. काही झाले तरी कोणत्याही परिस्थितीत माघार नाही अशी काहींनी भूमिका घेतल्याने त्यांची मते कोणाच्या पराभवाला कारणीभूत ठरणार याची गणिते मांडली जात आहेत. काहींना जाणिवपुर्वक काही वार्डमध्ये उभे करुन त्यांच्याकडून त्यांच्या संबंधितांची मते बाजूला करायची रणनिती आखली जात आहे. प्रचाराला केवळ आठ ते दहा दिवस मिळणार असल्याने उमेदवारी फिक्स असलेले उमेदवार आपल्या वार्डासह वार्डातील बाहेरगावी असलेल्यांना मतदारांना संपर्क करत आहेत. नगराध्यक्षपदाचे उमेदवार जास्तीत-जास्त अपक्ष माघार कशी घेतील, यासाठी प्रयत्न करत आहेत. एकंदरीत इच्छुकांची भाऊगर्दी असलेल्या चंदगड नगरपंचायतीसाठी बुधवारी माघारीमध्ये किती जण माघार घेणार यावरुन लढतीचे प्रमुख चित्र स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या अर्ज माघारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

No comments:

Post a Comment