चंदगड नगरपंचायतीसाठी प्रचार शिगेला, बाहेरगावच्या मतदारांसाठी फिल्डींग - चंदगड लाईव्ह न्युज

26 December 2019

चंदगड नगरपंचायतीसाठी प्रचार शिगेला, बाहेरगावच्या मतदारांसाठी फिल्डींग


संपत पाटील, चंदगड
चंदगड ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यापासून पहिल्यांदाच लागलेल्या निवडणुकीत पहिल्या नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद होण्यासाठी गेले आठ दिवस प्रचाराचा धुरळा उडाला आहे. एकेका मतासाठी नगरपंचायत निवडणुकीमध्ये कमालीची चुरस पहायला मिळत आहेत. गेले सहा-सात दिवस चाललेला प्रचार शिगेला पोहोचला असून आपली भूमिका पटवून देण्यासाठी उमेदवार घर-टू-घर प्रचार करत मतदारांच्या थेट संपर्कावर भर देत आहेत. रविवारी 29 डिसेंबर 2019 ला मतदान होणार असल्याने बाहेरगावी असलेल्या मतदारांना आणण्यासाठी हायटेक नियोजन केले जात असल्याचे चित्र चंदगड शहरामध्ये सद्या पहायला मिळत आहे. 
चंदगड नगरपंचायतीसाठी राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँगेस व शिवसेना यांनी राज्याच्या फॉर्मुल्याप्रमाणे एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन करुन तिन्ही पक्षाचे उमेदवार महाविकास आघाडीखाली एकत्र आणत निवडणुक लढवत आहेत. भाजपनेही सर्व अठरा जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. परिवर्तन पॅनेलनेही नगराध्यक्ष पदासाठी एक व नगरसेवक पदासाठी प्रभाग क्र. 2, 3, 5, 8 व 9 यांना प्रभागातून आपले उमेदवार निवडणुक रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे तिरंगी लढत होत आहे. मात्र नगरपंचायत निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर पै-पाहुणे व नातेसंबंध बघत पक्षापेक्षा व्यक्तीला महत्व दिले जात असल्याने अपक्ष देखील पक्षासाठी डोकेदुखी ठरणार आहेत. 
चंदगड नगरपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने पंचायत समिती सदस्य दयानंद काणेकर यांच्या पत्नी प्राची काणेकर, भाजपकडून संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष सुनिल काणेकर यांच्या पत्नी समृध्दी काणेकर, परिवर्तन पॅनेकडून अप्पी पाटील गटाचे कार्यकर्ते आनंद हळदणकर यांच्या पत्नी वैष्णवी आनंद हळदणकर तर शुभांगी उदय चौगुले या एकमेव अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदासाठी निवडणुक रिंगणात आहेत. 
जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे. तसतशी निवडणुकीतील रंगत वाढत आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपापल्या प्रभागातील उमेवारांना सोबत घेवून गल्लीतील घरा-घरापर्यंत पोहोचण्यासाठी पायाला भिंगरी लावली आहे. उमेदवार पदयात्रा व स्थानिक नेतेमंडळींना घेवून मतदारांच्या गाठीभेटीवर भर देताना दिसत आहेत. उमेदवारांचे नातेवाईकही मुलांना ख्रिसमसनिमित्त सुट्टी असल्याने नातेवाईक उमेदवारांच्या प्रचाराला आवर्जून हजेरी लावत आहेत. नगराध्यक्षपदासाठी प्राची काणेकर व सुनिल काणेकर यांच्यात काटेकी टक्कर होणार आहे. प्रभाग क्रमांक दोनमध्ये सर्वांधिक दहा उमेदवार असल्याने मतांची विभागणी होणार आहे. या विभागणीचा फटका बसणार की लाभ होणार हे पाहण्यासाठी निकालाची वाट पहावी लागणार आहे. महाविकास आघाडी, भाजप व परिवर्तन पॅनेलने जाहीरनामा प्रसिध्द करुन मतदारांच्यावर आश्वासनांची खैरात केली आहे. मात्र या आश्वासनांची पुर्तता कशी करतात हे येणारा काळात कळेल. आज सायंकाळी पाच वाजता प्रचाराची सांगता होणार असल्याने छुप्या प्रचार केला जाणार आहे. उमेदवारांनी प्रचारातून आपली व पक्षाची भूमिका पटवून दिली असली तरी मतदार राजा आपला कौल कोणाला देणार हे पाहण्यासाठी आपल्याला सोमवारी होणाऱ्या निकालाची वाट पहावी लागणार आहे. 



No comments:

Post a Comment