कोवाड / प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठ संलग्न कोवाड (ता. चंदगड) येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिर मंगळवार २८ जानेवारी ते सोमवार ३ फेब्रुवारी अखेर कालकुंद्री ता.चंदगड येथे संपन्न होणार आहे.
'सर्वांगीण ग्रामीण विकास व उन्नत भारत अभियान' हे शिबिराचे घोषवाक्य आहे. २८ रोजी दुपारी तीन वाजता चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते व संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य ए. एस. जांभळे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन कार्यक्रम संपन्न होणार असून यावेळी निवृत्त नेव्ही ऑफिसर ए. के. पाटील, एम.जे. पाटील, जि प. सदस्य अरुण सुतार व कल्लाप्पाण्णा भोगण, पंस. सदस्या रूपा खांडेकर व नंदिनी पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिबिरात २९ रोजी सकाळी श्रमदान कार्यक्रम उद्घाटन सुभाष रामू पाटील सेवा संस्था चेअरमन यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी सहा वाजता 'ग्रामीण विकासात ग्रामस्थांचे योगदान' या विषयावर प्रा. डॉ. डी. जी. चिघळीकर कोल्हापूर यांचे व्याख्यान. ३० रोजी सायंकाळी ६.३० वा. महिला मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम असून यावेळी डॉ.अर्चना प्रवीण पाटील यांचे 'महिला आरोग्य आणि महिला सक्षमीकरण' विषयावर व्याख्यान. ३१ रोजी सायंकाळी ६.३० वाजता 'श्रमप्रतिष्ठा आणि ग्रामीण विकास' विषयावर प्रा. एन. एस. पाटील यांचे व्याख्यान.
१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वा. 'सुदृढ भारत डायबेटीस मुक्त भारत' विषयावर डॉ.श्रीनिवास कातकर यांचे व्याख्यान. २ फेब्रु. रोजी सायं. ६.३० वाजता 'राष्ट्रवाद आणि आजची तरुणाई' विषयावर अखलाक भाई मुजावर महागाव यांचे व्याख्यान. तर याच दिवशी रात्री नऊ वाजता होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन शिवाजीराव कोकितकर यांच्या अध्यक्षतेखाली गजानन रा. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. शिबिर काळात ग्रामस्वच्छता, गटर सफाई, सार्वजनिक रस्ते दुरुस्ती, समाज प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, महिलांचे आरोग्य व शिक्षण, पशुसंवर्धन आदी प्रकल्प राबविले जाणार आहेत. ३ फेब्रुवारी रोजी अकरा वाजता संस्था सचिव एम. व्ही. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व शिवसेना संघटक संग्रामसिंह कुपेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगता समारंभ होणार आहे. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य एस एम पाटील. कालकुंद्री चे सरपंच विनायक कांबळे. उपसरपंच सुरेश नाईक. ग्रामपंचायत सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. सात दिवस चालणाऱ्या शिबिरातील विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन महाविद्यालय प्रशासन व कालकुंद्री ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment