चंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील श्री साई नाट्यधारा मंडळाच्या वतीने 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2020 या दरम्यान चंदगडी नाट्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. सात दिवस चालणाऱ्या या नाट्यमहोत्सवाला हलकर्णी फाटा येथील विवेक इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये सायंकाळी सात वाजता नाटकांना प्रांरभ होईल अशी माहीती संयोजन परशराम गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या नाट्य महोत्सवात बुधवारी 29 जानेवारी 2020 ला साई कलामंच कुडाळ यांच्या वतीने `तुझ्यात जीव रंगला` हे नाटक सादर केले जाईल. गुरुवारी 30 जानेवारीला हिरण्य नाट्यसंस्था आजरा यांचे `नियतीच्या बैलाला` ही नाट्यकृती, शुक्रवारी 31 जानेवारीला लोकरंगभुमी सांगली यांचे `पुर्णविराम` हे नाटक, शनिवारी 1 फेब्रुवारी 2020 रोजी फिनिक्स क्रिएशन्स, कोल्हापूर यांचे `ह्येच्या आईचा वग` हि नाट्यकृती, 2 फेब्रुवारीला भारतीय क्रिडा शिक्षण व नाट्य मंडळ, सोलापूर यांचे `या भूतांनो या` हि कलाकृती, सोमवारी 3 फेब्रुवारीला अभिनय कल्याण, मुंबई यांचे `घटोत्कच` हे नाटक तर शेवटी 4 फेब्रुवारीला साई नाट्यधारा चंदगड यांच्या वतीने `विच्छा ! माझी पुरी करा` अशी एकूण सात दिवस सात नाटके या नाट्य महोत्सवात सादर होतील.
यावेळी संयोजक परशराम गावडे म्हणाले, ``चंदगड तालुका हा अनेक कलागुणांनी संपन्न अलेल्या लोकांचा तालुका आहे. या तालुक्याला अनेक कलांकारबरोबर नाट्यकलेची मोठी परंपरा आहे. कोणतीही भौतिक साधने उपलब्ध नसलेल्या काळात या तालुक्याने ही कला प्राणपणाने जपली होती. गावोगावी शेतीची आणि इतर कष्टाची कामे करीत यात्रा आणि जत्रांमध्ये गावातीलच हरहुन्नरी कलाकार एकत्र येऊन नाटक करायची येथे परंपरा आहे. त्यातून प्रत्येक गावातील हौसी कलाकारांना नाटक ही कला समजून घेण्याची आणि अभिनय करायची संधी उपलब्ध होते. परंतु अलीकडच्या काही वर्षांमध्ये गावातून हि नाटके हद्दपार होत असल्याचे चित्र आहे. यात्राजत्रातून नाटकांऐवजी चित्रपट, कलापथके, रेकार्ड डान्स स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. आता घराघरातील टीव्हीमध्ये मालिकांचे पेव वाढले आहे. पर्यायाने या भागातील एक महत्त्वाची कलाच नष्ट होत गेली. त्यासाठी ती पुन्हा पुनर्जीवित करण्याच्या उद्देशाने नाट्यमहोत्सवाचे आयोजन केल्याचे सांगितले.`` सदर नाट्यमहोत्सवातील नाटकांचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेस अविनाश पाटील, धनाजी पाटील, आर आय पाटील,मनोहर चांदेकर,विजय मोरे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment