प्रहार अपंग संघटनेचा विविध मागण्यासाठी चंदगड तहसिलवर मोर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

13 January 2020

प्रहार अपंग संघटनेचा विविध मागण्यासाठी चंदगड तहसिलवर मोर्चा

अपंग प्रहार क्रांती संघटनेच्या वतीने दिव्यागांच्या विविध मागण्यासाठी चंदगड तहसिलवर मोर्च काढण्यात आला. यावेळी मोर्चा सहभागी झालेले अपंग बांधव. 
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील  दिव्यांगांना महाराष्ट्र सरकारने न्याय द्यावा. यासह अन्य मागण्यासाठी चंदगड तहसील कार्यालयावर आज प्रहार अपंग क्रांती संघटनेमार्फत  मोर्चा काढून तहसिलदार विनोद रणावरे यांना निवेदन देण्यात आले. अंध, अपंग, अनाथ, विधवा, परितक्त्या, निराधार, जर्जर रोगी इत्यादी लहान थोर, वृध्द महिला, पुरुष मोर्चामध्ये सहभागी झाले होते. 
चंदगड येथील संभाजी चौकातून बाजारपेठमार्गे मोर्चा चंदगड तहसील कार्यालयापर्यत गेला. दिव्यांगाना न्याय मिळालाचे पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा देत मोर्चा काढला. निवेदनात म्हटले आहे की, ``गेली अनेक वर्षे चंदगड तालुका कार्यक्षेत्रासह तमाम महाराष्ट्रातील दिव्यांग गरिबांना सन्मानाने जगता यावे.  यासाठी सरकारकडे टाहो फोडून कैफियत मांडत आहोत . पण गेल्या दोन वर्षाच्या कालखंडात चंदगड तहसील कार्यालयासमोर अनेक आंदोलने झाली. परंतु तहसील कार्यालयाने फारशी गांभीर्याने दखल घेतली नाही. दिव्यांगांना न्याय देणारी सामजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग तालुका पातळीपासून ते जिल्हा व राज्य पातळीपर्यंत कागदपत्रे रंगविण्यात मग्न आहे. तो आस्थेने दिव्यांगांपर्यंत पोहचलाच नाही. यासाठी सरकारला जाग आणण्यासाठी हा मोर्चा काढल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मोर्चामध्ये लक्ष्मण बेनके, अमोल कांबळे, सतीश कांबळे, सिताराम गावडे, संदीप पाटील, आणाप्पा गोरल, विठ्ठल वांद्रे, महादेव गावडे, नारायण सुतार, मारूती भाटे, राजश्री पिटूक, सरिता पाटील, गंगुबाई गावडे, संजीवनी सुतार, गीता बैलूरकर आदीसह दिव्यांग बांधव मोर्च्यात सहभागी झाले होते. 

No comments:

Post a Comment