कोवाड येथे गावाअंतर्गत रस्त्यासाठी ग्रामपंचायतीवर मोर्चा, महिलांचा लक्षणीय सहभाग - चंदगड लाईव्ह न्युज

15 January 2020

कोवाड येथे गावाअंतर्गत रस्त्यासाठी ग्रामपंचायतीवर मोर्चा, महिलांचा लक्षणीय सहभाग

पंधरा दिवसात रस्ता दुरुस्तीचे ग्रामपंचायतीकडून आश्वासन
कोवाड येथे रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी ग्रामपंचायतीला निवेदन देताना नागरीक. 
कोवाड / प्रतिनिधी
कोवाड (ता. चंदगड) येथील रणजितनगर व श्रीरामनगर नागरिकांचा रस्त्याच्या डांबरीकरणासाठी येथील नागरीकांनी मोर्चा काढून मागणीकडे लक्ष वेधले. यामध्ये महिलांचाही लक्षणीय सहभाग होता. यावेळी मागण्यांचे निवेदन सरपंच सौ. अनिता भोगणव ग्रामसेवक जी. एल. पाटील यांच्याकडे दिले. यावेळी येत्या पंधरा दिवसात रस्ता दुरुस्तीचे काम केले जाईल असे आश्वासन ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आले.

रणजितनगर व श्रीरामनगरमधील लोकवस्ती पाचशेपर्यंत असून अनेक वर्षापासून येथील नागरिकांना रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रास सहन करावा लागला. याच रस्त्यावर श्री राम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज असल्याने रोज हजार- बाराशे विद्यार्थी या रस्त्याने ये-जा करतात. त्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करताना अनेकदा छोटे-छोटे अपघात झाले आहेत. असे असताना ग्रामपंचायतीचे त्याकडे दुर्लक्ष होते. संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने ग्रामस्थांना व शालेय विद्यार्थ्याना चालणेही कठीण झाले आहे. पण त्याकडे डोळेझाक झाल्याने आज नागरिकांच्या व शाळेच्या वतीने मोर्च्याद्वारे रस्ता दुरुस्तीचे निवेदन देण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालयात रस्त्याच्या प्रश्नाबाबत चर्चा सुरु असताना जमलेले नागरीक.
ग्रामपंचायत सभागृहामध्ये नागरिक जमले होते. या दोन्ही भागातील रस्त्याबाबत तसेच सांडपाण्याची समस्या अशा अनेक अडचणी येत आहेत. याबाबत ग्रामपंचायतीला रस्ता दुरुस्तीबाबतची मागणी केली. यावर सदर रस्त्याचे काम येत्या 15  दिवसात सुरु करण्यात येईल असे आश्वासन सरपंच सौ. अनिता भोगण यांनी नागरिकांना दिले. निवेदनावर गोविंद आडाव, अशोकराव देसाई, जाणबा कांबळे, विक्रम कांबळे, गुरुसिद्ध बुरुड, शिवाजी राजगोळकर, दुध्याप्पा कित्तूरकर, सागर बिर्जे, मयूर हजारे, गजबर बाडकर, सागर जाधव, कलाप्पा वांद्रे, अरुण सुर्वे, संतोष किणगी,  तुकाराम कांबळे, विनायक पोटेकर, अजित वडर, नदीम मुल्ला, जोतिबा व्हन्याळकर, विनायक पाटील, विठ्ठल पाटील, राहुल कुंभार, अशोक बागडी, कल्लाप्पा सांबरेकर यांच्यासह अन्य नागरीकांच्या सह्या आहेत. 


No comments:

Post a Comment