वसतीगृह चळवळीतून अनेक माणसे मोठी झाली - डॉ. मधुकर जाधव - चंदगड लाईव्ह न्युज

31 January 2020

वसतीगृह चळवळीतून अनेक माणसे मोठी झाली - डॉ. मधुकर जाधव

चंदगड येथील खेडूतच्या महात्मा गांधी वसतीगृहाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात बोलताना  डॉ. मधुकर जाधव व इतर.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात सर्व प्रथम माध्यमिक शिक्षण व विद्यार्थी वसतीगृह निर्माण करून  खेडूतने बहुजन समाजातील मुलांना शिक्षण देण्याचे काम केले. आपल्या महाराष्ट्रात छ. शाहू महाराजांनी वस्तीगृहाची सुरुवात करून दिली. तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी संपूर्ण महाराष्ट्रात वसतीगृहे स्थापन करून बहुजनांना शिक्षित केले.  या वसतीगृहाच्या चळवळीतूनच महाराष्ट्रात मोठ-मोठी माणसे निर्माण झाली आहेत असे प्रतिपादन डॉ. मधुकर जाधव यांनी केले. चंदगड येथील खेडूत शिक्षण मंडळाच्या म. गांधी विद्यार्थी वसतीगृहाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी सौ. व्ही. आर. बांदिवडेकर होत्या. 
प्रा. जाधव  पुढे म्हणाले, ``चंदगड तालुका हा दुर्गम होता. त्या काळात विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय करून त्यांच्या राहण्याची सोय पण खेडूत शिक्षण मंडळाने केली. या वसतिगृहात राहून शिकलेली मुले आज वेगवेगळ्या मोठया पदावर काम करत आहेत. वसतिगृहाची ही चळवळ अशीच चालू ठेवून अनेक विद्यार्थी घडवावेत, त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तीनी पुढे आले पाहिजे, वसतीगृह चळवळीतून मोठी माणेस निर्माण झाली. त्यांनी आपल्या मनोगतातून वसतिगृहाच्या सुवर्ण महोत्सवी निमित्त शुभेच्छा दिल्या. अध्यक्षस्थानावरून बोलताना सौ. व्ही. आर. बांदिवडेकर यांनी वसतीगृहातून शिकून गेलेल्या विद्यार्थ्याचा आम्हाला अभिमान असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कै. र. भा. माडखोलकर व कै. तुळसाबाई माडखोलकर यांनी वसतिगृहासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष  एल. डी. कांबळे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी म. गांधी वसतिगृहाच्या स्थापनेपासूनचा आढावा घेवून या वसतिगृहातून अनेक अधिकारी, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक निर्माण झाल्याचे सांगितले. या कार्यक्रमात वसतिगृहाचे माजी विद्यार्थी, माजी अधिक्षक व चंदगड नगरपंचायतीचे नुतन नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी प्राचार्य एस. व्ही. गुरबे यांनी वसतीगृहातील १० वी बोर्ड परीक्षेमध्ये प्रथम येणाऱ्या  विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देणेसाठी रू. ५००० / - रकमेची ठेव पावती वसतीगृहाचे अध्यक्ष यांचेकडे सुपूर्द केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. एन. एम. मासाळ यांनी तर आभार आर. जी. साबळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी वसतीगृहाचे सदस्य एम. एस. मुळीक,  ए. जी. बोकडे, प्रा. एस. एम. पाटील, प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील, प्राचार्य व्ही. जी. तुपारे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment