वनविभागाच्या चंदगड कार्यालयासमोर उपोषणास बसलेले पारगड मिरवेल चे ग्रामस्थ. |
कालकुंद्री / प्रतिनिधी
किल्ले पारगड ते मोर्ले रस्त्यांपैकी रखडलेल्या दिड किमी रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा. अशी मागणी करत तानाजींचे मामा शेलारमामा यांचे पारगड वरील वंशज व सामाजिक कार्यकर्ते ६८ वर्षीय रघुवीर खंडोजी शेलार उर्फ शेलारमामा व त्यांचे पंचक्रोशीतील मिरवेल गावचे १२ मावळे चंदगड येथील वन विभागाच्या कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषणला बसले होते. बांधकाम विभागाची लेखी हमी व चंदगड पोलीस निरीक्षक अशोक सातपुते यांच्या मध्यस्थीनंतर यशस्वीरित्या मागे घेण्यात आले.
चंदगड हून पारगड, दोडामार्ग, पणजी, गोव्याला जोडणारा हा सर्वात जवळचा व कमी घाटाचा मार्ग आहे. राजमार्ग १८७ मोरले ते पारगड रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. पैकी कोल्हापूर जिल्ह्यातील पारगड नजीक दीड किमी रस्ता वनविभाग हद्दीत येतो. यातील ३.२० हेक्टर जमिनीचे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुसरीकडील जमिनीचे वनविभागाकडे हस्तांतरण वेळेत न केल्यामुळे वन विभागाने येथे रस्ता रुंदीकरण व काम करण्यास मज्जाव केला होता. हस्तांतरणाची सर्व प्रक्रिया पंधरा दिवसात पूर्ण करून देण्याची लेखी हमी बांधकाम विभागाच्यावतीने अभियंता संजय सासणे यांनी माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील, पोलिस निरीक्षक अशोक सातपुते, वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर राक्षे व पत्रकारांच्या उपस्थितीत लेखी स्वरूपात दिल्यानंतर रघुवीर शेलार व त्यांच्या मावळ्यांनी उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला.
प्रजासत्ताकदिनी सायंकाळपर्यंत वनविभागाचे वनक्षेत्रपाल राक्षे, बांधकाम विभागाचे संजय सासणे, वितरण कंपनीचे प्रतिनिधी यांनी आपापली भूमिका उपोषण कर्त्यासमोर मांडली. शेवटी समाधानकारक लेखी हमी नंतर उपोषण थांबवण्यात आले. शेलार यांच्यासोबत उपोषणास बसलेल्यांत पारगड, मिरवेल, नामखोल ग्रुप ग्रामपंचायत चे माजी सरपंच विद्याधर बाणे, बुधाजी कृष्णा पवार, मनोहर कृष्णा पवार, महादेव लक्ष्मण पवार, गोपाळ यशवंत पवार, विद्याधर बाणे, आत्माराम बाणे, तुकाराम महादेव सुतार, महादेव भोजू पवार, अरुण विठ्ठल पवार, जयेश देविदास पवार आदींचा समावेश होता.उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सह्याद्रीच्या डोंगर कपारीत गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. तथापि लोकप्रतिनिधींनी फिरवल्याचे प्रकर्षाने जाणवले.
No comments:
Post a Comment