कालकुंद्री (प्रतिनिधी)
कालकुंद्री ता. चंदगड येथील ग्रामदैवत व जागृत देवस्थान श्री कलमेश्वर देवाचा वार्षिक 'अखंड नाम सप्ताह' 'सांब सदाशिव सांब हर हर सांब सदाशिव सांब' च्या नामघोषात शनिवार दिनांक 29 फेब्रुवारी रोजी प्रारंभ होत आहे. सप्ताहाची सांगता शनिवार 7 मार्च रोजी महाप्रसादाने होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात एक वैशिष्ट्यपूर्ण अखंड नाम सप्ताह म्हणून या सप्ताहाची ख्याती आहे. केडगाव चे नारायण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 1929 साली ग्रामस्थांच्या मदतीने हरि नारायण कालकुंद्रीकर उर्फ हरीनाना यांनी सप्ताहला सुरुवात केली. असा लिखित इतिहास आहे. सप्ताहाचे हे 91 वे वर्ष आहे. या काळात आठ दिवस रात्रंदिवस श्रीशंकराच्या अखंड नाम जपासह रोज सायंकाळी प्रवचन, रात्री 9 ते 12 किर्तन व इतर वेळी भावगीत, भक्तिगीत गायन, पंचक्रोशीतील भजनी मंडळाची भजने, शुक्रवार 6 रोजी नवसाच्या मुलांची तुलादान (वजन करणे) व 7 रोजी महाप्रसाद आहे. याच दिवशी रात्री प्राथमिक माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविक भक्तांना घ्यावा असे आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. गावातील सर्व प्रकारची कामे सप्ताहानिमित्त आठ दिवस बंद राहत असल्यामुळे गावातील युवक मंडळांनी या काळात प्रो कबड्डी सह इतर खेळांचे आयोजन केले आहे.
No comments:
Post a Comment