चंदगड तालुका पत्रकार संघाला राज्यस्तरीय पुरस्कार, 8 रोजी अक्कलकोट येथे वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

06 February 2020

चंदगड तालुका पत्रकार संघाला राज्यस्तरीय पुरस्कार, 8 रोजी अक्कलकोट येथे वितरण


चंदगड / प्रतिनिधी
मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखली जाणाऱ्या 'मराठी पत्रकार परिषद मुंबई' कडून दिला जाणारा मानाचा 'वसंतराव काणे, राज्यस्तरीय आदर्श तालुका पत्रकार संघ' पुरस्कार चंदगड तालुका पत्रकार संघाला जाहीर झाला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांचा समावेश असलेल्या कोल्हापूर विभागातून चंदगड पत्रकार संघाची निवड झाली आहे. राज्यातील ८ विभागात ३५४ तालुका पत्रकार संघ असून प्रत्येक विभागातून एक; अशा आठ उत्कृष्ट तालुका पत्रकार संघांची निवड पुरस्कारासाठी केली आहे. पुरस्कार वितरण अक्कलकोट जि. सोलापूर येथे उद्या दि. ८ रोजी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, राज्याध्यक्ष गजानन नाईक व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे व उपाध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी दिली. 
चंदगड तालुका पत्रकार संघाच्या स्थापनेचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष असून गेल्या पंचवीस वर्षात संघाच्या माध्यमातून राबवलेल्या जिल्ह्यात पहिल्यांदा गणराया अवॉर्ड ची सुरुवात, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, शेती व आरोग्यविषयक उपक्रम, चंदगड तालुक्यातील महापूर, दुष्काळी स्थिती, अतिवृष्टी, राजकीय व सामाजिक स्थितीवर भाष्य करणाऱ्या वस्तुनिष्ठ बातम्या, विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य, चांगल्या विधायक काम करणाऱ्या संस्था, संघटना, व्यक्ती यांना प्रसिद्धी व पाठबळ, विविध शासकीय योजनांच्या यशस्वीतेसाठी पत्रकारितेच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल यानिमित्ताने परिषदेने घेतली आहे. पत्रकार संघाकडे सध्या २५ सभासद असून या रौप्यमहोत्सवी वर्षात विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्याचे नियोजन पत्रकार संघाने केले आहे अशी माहिती संचालक संपत पाटील व पदाधिकाऱ्यांनी दिली.

No comments:

Post a Comment