किणी येथे शिक्षक बँक गुणगौरव सोहळ्यात प्रतिपादन
कालकुंद्री / प्रतिनिधी
![]() |
किणी येथे शिक्षक बँक गुणगौरव कार्यक्रमात बोलताना आम. राजेश पाटील, सोबत भरमूआण्णा पाटील, सभापती कांबळे, पै. विष्णू जोशीलकर, बँकेचे चेअरमन नामदेव रेपे, संचालक शिवाजी पाटील आदी. |
ज्ञानदानाचे पवित्र कार्य समर्थपणे करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांवर अशैक्षणिक काम नाकारले म्हणून प्रशासनाकडून दाखल होणारे फौजदारी गुन्हे हा आततायीपणा आहे. हे थांबवण्यासाठी आपण प्रयत्नशील असून असे प्रकार होणार नाहीत यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे. असे प्रतिपादन चंदगड चे आमदार राजेश पाटील यांनी केले. ते किणी (ता. चंदगड) येथे संपन्न शिक्षक बँक शाखा हलकर्णी च्या वतीने आयोजित गुणगौरव कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री भरमू अण्णा पाटील, गोपाळराव पाटील, सुरेश चव्हाण-पाटील, प्रभाकर खांडेकर, जिप सदस्य कल्लाप्पांना भोगण उपस्थित होते.
![]() |
महाराष्ट्र लोक रत्न सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल कोवाड केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांना सन्मानित करताना मान्यवर. |
प्रास्ताविक बँकेचे चंदगड तालुका संचालक शिवाजी पाटील यांनी केले. मान्यवरांचे स्वागत चेअरमन नामदेव रेपे व रमेश हुद्दार आदींच्या हस्ते झाले. दिप प्रज्वलन पंस सभापती अनंत कांबळे व उपसभापती मनीषा शिवणेकर यांनी केले. यावेळी बोलताना शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे म्हणाले जुन्यांसह नव्या आमदारांना पेन्शन मिळते; मग २००५ नंतरच्या नव्या शिक्षकांना का नाही? पेन्शन कर्मचाऱ्यांच्या म्हातारपणाची काठी आहे ती शासनाने हिरावू नये. सेवानिवृत्त शिक्षकांना सातव्या आयोगाचा फरक एकरकमी मिळावा म्हणजे त्यांना जिवंतपणी वापरता येईल. जिप. ने आदेश देऊनही शाळांची वीज बिले न भरणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई झाली पाहिजेत. वीज नसल्यामुळे शाळातील डिजिटल उपकरणे धूळखात पडली असून त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याची जाणीव त्यांनी करून दिली . भरमूआण्णा पाटील म्हणाले विद्यार्थी गुरुजनांच्या उपदेशाने घडतात, त्या गुरूंचा आदर समाजाने ठेवला पाहिजे व गुरुनेही त्या आदराला पात्र राहिले पाहिजेत. पंस. सभापती कांबळे यांनी आपण शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांविरोधात असून पंस. च्या येत्या मासिक बैठकीत शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये असा ठराव करणार असल्याचे सांगितले. तर प्रभाकर खांडेकर यांनी शिक्षकांना अशैक्षणिक कामासाठी त्रास देण्याचे प्रकार थांबले नाहीत तर प्रांत व तहसीलदार कार्यालयांना शिवसेना स्टाईल दाखवण्यात येईल. यावेळी पै. विष्णू जोशीलकर, गोपाळराव पाटील, सुरेशराव चव्हाण पाटील, शिक्षक बँकेचे अध्यक्ष नामदेव रेपे आदींची मनोगते झाली. यावेळी शिक्षक बँकेच्या वतीने सन २०१७-१८ व १८-१९ मधील स्वच्छ सुंदर हिरवी शाळा पुरस्कार देण्याबरोबरच आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक, शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी व मार्गदर्शक, दहावी, बारावी व अन्य गुणवंत विद्यार्थी तसेच दसऱ्या दिवशी कोवाड-कागणी मार्गावरील अपघातात जखमींचे प्राण प्रसंगावधानाने वाचणार्या विशाल श्रीकांत पाटील (कालकुंद्री) आदींना सन्मानित करण्यात आले.
यावेळी शिक्षक बँक सिईओ श्रीकांत कुलकर्णी, शाखाधिकारी जयसिंग देसाई, शि. ल. होनगेकर, रा. निं. गावडे, सदानंद पाटील, टी.जे. पाटील, केंद्र प्रमुख यशवंत चौधरी, निटुरकर, दस्तगीर उस्ताद, वसंत जोशिलकर, सरपंच वसंत सुतार आदींची उपस्थिती होती. आभार अशोक नौकुडकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment