महासागराच्या गर्भातही मराठी माणूस यशस्वी होऊ शकतो - निवृत्त नौदल अधिकारी अशोक पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

02 February 2020

महासागराच्या गर्भातही मराठी माणूस यशस्वी होऊ शकतो - निवृत्त नौदल अधिकारी अशोक पाटील

कोवाड महाविद्यालयाचे कालकुंद्री येथे श्रमसंस्कार शिबिर प्रारंभ
कालकुंद्री येथे कोवाड महाविद्यालय श्रमसंस्कार शिबिर उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे अशोक पाटील सोबत अन्य मान्यवर.
कालकुंद्री (प्रतिनिधी) 
अथांग महासागराच्या गर्भातील कामातही मराठी माणूस यशस्वी होऊ शकतो; केवळ इच्छाशक्ती पाहिजे. असे प्रतिपादन कालकुंद्री गावचे सुपुत्र निवृत्त नौदल अधिकारी अशोक के. पाटील यांनी केले. ते कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय कोवाड च्या वतीने सुरू असलेल्या कालकुंद्री ता. चंदगड येथील राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. डॉ. पी. एस. पाटील कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते झाले.
प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा आर. डी.  कांबळे यांनी केले. स्वागत सरपंच विनायक कांबळे व उपसरपंच सुरेश नाईक यांनी केले. पुढे बोलताना अशोक पाटील म्हणाले सध्या आपण चालवत असलेल्या अंडरवॉटर सर्व्हिसेस मध्ये समुद्राच्या एक किलोमीटर खोलीवर ही वेल्डिंग, खुदाई, बांधकाम सह सर्व कामे केली जातात. यात राजस्थान बिहार सह परराज्यातील कारागीर दिवसाला पाच हजार ते पन्नास हजार रुपये कमवतात. तथापि ज्या छत्रपती शिवरायांना भारतीय आरमाराचे जनक (फादर ऑफ इंडियन नेव्ही) संबोधले जाते त्यांच्याच महाराष्ट्रातील तरुणांची नौदलातील वानवा चिंताजनक आहे. मराठा आरमाराचे पहिले सेनापती दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांचा आदर्श घेऊन तरुणांनी भारतीय नौदलात दाखल होऊन मराठी टक्का वाढवावा. या कामी त्यांना आपण सर्वतोपरी मार्गदर्शन करायला करण्यास तयार आहोत. प्रसिद्ध दर्यावर्दी ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून आपण १९८६ साली पॅसिफिक, अटलांटिक, हिंद महासागरात हेलीकॉप्टर मधून डायविंग केल्याचे अनुभव संगितले. पाटील हे बेळगाव रोटरी क्लब चे ज्येष्ठ सदस्य आहेत. याप्रसंगी आमदार राजेश पाटील. एम. जे. पाटील, प्राचार्य डॉ एस, एम. पाटील आदींनी मनोगत व्यक्त केली. संस्थाध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे, सचिव एम. व्ही. पाटील, संचालक पी. सी. पाटील, गोविंद पाटील, बी.के. पाटील, याकूब मुल्ला आदींसह सर्व संचालक, सर्व ग्रापं सदस्य, विद्यार्थी-विद्यार्थिनी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार  ग्रामसेवक व्ही. बी.भोगन यांनी मानले. सर्वांगीण ग्रामीण विकास व उन्नत भारत अभियान हे घोषवाक्य घेऊन शिवाजी विद्यापीठाच्या सहकार्याने सुरू असलेले श्रमसंस्कार शिबिर सात दिवस चालणार असून यावेळी विविध व्याख्यानमाला व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment