अनियमित बससेवेचा शालेय विद्यार्थ्यांना फटका, बोर्ड परिक्षेच्या पार्श्वभूमीवर बससेवा सुरळीत करण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

14 February 2020

अनियमित बससेवेचा शालेय विद्यार्थ्यांना फटका, बोर्ड परिक्षेच्या पार्श्वभूमीवर बससेवा सुरळीत करण्याची मागणी


कोवाड / प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसापासून कोवाड परिसरातील एस. टीच्या बसफेऱ्या विस्कळीत झाल्या आहेत. याचा सर्वाधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. पासधारक विद्यार्थ्यांचे तर शैक्षणिक नुकसानीसह आर्थिक नुकसानही होत आहे. येत्या १८ फेब्रुवारी पासून बारावीच्या बोर्ड परीक्षेला सुरवात होणार आहे. त्यामुळे परीक्षा काळात बस सेवा सुरळीत राहील का, असा प्रश्न विद्यार्थी शिक्षण संस्थांना विचारत आहेत. कोवाड परिसरात सतत बस फेऱ्या विस्कळीत होत असल्याने विद्यार्थी व पालकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. गेल्या महिन्याभरापासून कोवाड परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थी याचा अनुभव घेत आहेत. अचानक बस सेवा विस्कळीत होत असल्याने विद्यार्थ्याना त्याचा त्रास सहन करावा लागला आहे. आगार प्रमुखाना याबाबत कळवूनही त्याची गांभिर्याने दखल घेतली नसल्याने विद्यार्थी व पालकांच्यातून रोष व्यक्त होत आहे. आता १८ फेब्रुवारी पासून बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरु होत असल्याने बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर बसची गरज आहे. बस वेळेवर आल्या नाहीत तर आपण वेळेवर परीक्षा केंद्रावर जाऊन पोहचणार नसल्याची भिती त्यांच्यात आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांच्याकडे बस सेवा सुरळीत करण्याबाबत मागणी केली आहे. त्याअनुषंगाने कोवाड येथील बारावीच्या केंद्राचे केंद्र प्रमुख प्रा. एस. डी. सावंत यांनी आगार प्रमुखाना परीक्षा काळात बस सेवा नियमित सुरु ठेवावी अशी लेखी मागणी केली आहे.  कोवाड येथे बारावीच्या परीक्षेचे केंद्र आहे. येथे परिसरातील पाचशे विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत. यातील बहुतांशी विद्यार्थी बाहेरगावचे असल्याने त्याना बसची गरज आहे. पण या भागातील बस सेवा सतत कांही ना काही कारणास्तव विस्कळीत केली जाते. त्याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. नियमित रुटवर असलेल्या बसही अचानक बंद केल्या जातात. काही अन्य मार्गाने वळविल्या जातात. पण याची प्रवाशाना माहितीही नसते. शालेय विद्यार्थी मात्र बसची वाट पाहत दिवसभर ताटकळत थांबतात. त्यामुळे विद्याथ्र्यांना परीक्षा काळात अशा अचानक बस रद्द केल्या तर आपली अडचण होईल. आपल्याला परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहचता येणार नाही अशी भिती वाटते. त्यामुळे आगार प्रमुखानी बस सेवा सुरळीत करुन प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment