![]() |
डुक्करवाडी (ता. चंदगड) विद्यालय व चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने आयोजित मराठी राजभाषा दिनानिमित्त कार्यक्रमात बोलताना संघाचे उपाध्यक्ष बी. एन. पाटील व इतर. |
चंदगड / प्रतिनिधी
मराठी भाषा ही अमृताशी पैज जिंकणारी आहे. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या माणसांनी लेखन व वाचन चळवळ वाढवली तर खऱ्या अर्थाने मराठी भाषेला चांगले दिवस येतील असे प्रतिपादन चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे उपाध्यक्ष बी. एन. पाटील यांनी केले. डुक्करवाडी (ता. चंदगड) विद्यालय व चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने मराठी राजभाषा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ए. एन. पाटील होते.
कविवर्य कुसुमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांचा आज जन्मदिवस मराठी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. चंदगड तालुका मराठी अध्यापक संघ व बागीलगे डुक्करवाडी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर मराठीत तयार केलेल्या भिंती फलकाचे उद्घाटन आर. व्हि. ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले. चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष महादेव शिवणगेकर यांनी प्रास्ताविक केल्यानंतर मराठी निबंध, वकृत्व स्पर्धेत भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण झाले. बी. एन. पाटील म्हणाले, ``इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य केलं या काळात अनेक भाषा लोक व्यवहारात आल्या. हे वास्तव असताना मराठी ज्ञानभाषा होण्याची स्वप्न अपूर्णच राहत असून महाराष्ट्रात उच्चशिक्षणाची भाषा इंग्रजीत आहे .प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षणाच्या पातळीवरही मराठी दुय्यम स्थानावर जात आहे. असे चित्र आहे .मराठीत आलेल्या इतर भाषांचे आक्रमण वाढू लागल्याने इतर भाषा मराठी होत असल्याने मराठीची गळचेपी होत आहे .महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण होत असताना आपली मराठी भाषा ही लोक व्यवहाराच्या ज्ञान भाषा झाली आहे का ? याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचे बी. एन. पाटील यांनी व्यक्त केले . तर कवी संजय साबळे म्हणाले मराठी भाषेला समृद्ध आणि विशाल परंपरा आहे. मराठी भाषेच्या अस्मितेचा पहिला धडा फडकला तो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी .साधुसंतांच्या पवित्र विचारानं समृद्ध असलेली मराठी भाषेवर आज परकीय भाषांचे आक्रमण होत आहे. आज मराठी भाषेतच आपल्या मुलांना कॉन्व्हेंट स्कूल ला घालून मराठी पासून मराठीच्या पोरांना दूर केले जात आहे. अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी माय मराठी वर जीवापाड प्रेम केले पाहिजेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.`` यावेळी व्यासपीठावर जी. व्ही. गावडे, व्ही. एल. सुतार, नाट्यकलावंत परशराम गावडे, जी. व्ही. कांबळे यांच्यासह चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते. पी. एस. मगदुम यांनी सुत्रसंचालन केले. राजेंद्र शिवणगेकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment