बेळगाव ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सागर देशपांडे - चंदगड लाईव्ह न्युज

25 February 2020

बेळगाव ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सागर देशपांडे


चंदगड / प्रतिनिधी
सीमाभागातील मराठी भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी कार्यरत असलेल्या मराठी संवर्धन सांस्कृतिक मंडळाच्या वतीने रविवारी 1 मार्च 2020 रोजी बेळगाव येथे ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार, लेखक, प्रसिद्ध वक्ते आणि जडण-घडण मासिकाचे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे यांची या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेच्यावतीने मधू बेळगावकर यांनी दिली.
डॉ. सागर देशपांडे
मधु बेळगावकर म्हणाले, ``या गावाच्या परिसरात प्रथमच असे साहित्य संमेलन होत असल्याने ग्रामस्थ, वारकरी, महिलांचा फार मोठा प्रतिसाद लाभला आहे. ग्रंथदिंडी, चित्ररथ, भजनी मंडळ यांचे सादरीकरण, अध्यक्षीय भाषण, कथाकथन, कवी संमेलन आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, असे सकाळी आठ पासून रात्रीपर्यंत भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. बेळगाव जवळच्या बेनकनहळी गावातील मराठी शाळेच्या मैदानावर होणाऱ्या या एक दिवसीय साहित्य संमेलनासाठी सुमारे पाच हजारापेक्षा अधिक मराठी भाषिक साहित्यप्रेमी उपस्थित राहणार आहेत.`` 
यापूर्वी आंबेवाडी ता. बेळगाव तसेच कोवाड ता. चंदगड, जि. कोल्हापूर येथे स्वामीकार रणजित देसाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ झालेल्या साहित्य संमेलनाचेही अध्यक्षपद देशपांडे यांनी भूषवले होते. गेली 34 वर्षे पत्रकारितेमध्ये कार्यरत असलेले सागर देशपांडे हे सीमा प्रश्नाचे अभ्यासक म्हणून सर्वपरिचित आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारसह त्यांना पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 15 पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांची एकूण आठ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यातल्या काही पुस्तकांनाही पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय ते संपादित करत असलेल्या 'जडणघडण' या मासिकाला गेल्या सोळा वर्षात उत्कृष्ट निर्मितीचे राज्यस्तरीय अकरा पुरस्कार मिळाले आहेत. आंतरराष्ट्रीय दीर्घायु केंद्रातर्फे त्यांचा इन्फोसिस चे संस्थापक डॉक्टर नारायण मूर्ती यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला आहे. पत्रकारिता आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करणारे देशपांडे आंतरभारती शिक्षण मंडळ, लोकसाधना प्रकल्प, मृत्युंजय प्रतिष्ठान, लक्ष्मी रघुनाथ मेडिकल फाउंडेशन सह अनेक सार्वजनिक संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आज पर्यंत त्यांची महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यात तीनशेहून अधिक व्याख्याने झाली आहेत.

No comments:

Post a Comment