गुजरातमध्येही शिवजयंतीचा उत्साह शिगेला, मोरबीसह विविध शहरांत शिवजयंती साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

19 February 2020

गुजरातमध्येही शिवजयंतीचा उत्साह शिगेला, मोरबीसह विविध शहरांत शिवजयंती साजरी

मोरबी (गुजरात) येथे शिवजयंतीनिमित्त छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन करताना डॉ. राजू पाटील यांचेसह मराठी बांधव.
चंदगड / प्रतिनिधी
महाराष्ट्राचे व मराठी माणसाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्साह महाराष्ट्राबाहेर गुजरातमध्येही मोठ्या प्रमाणावर दुमदुमत आहे. अखिल सौराष्ट्र महाराष्ट्र मंडळ मार्फत गुजरात मधील मोरबी शहरात विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.
गेल्या दहा वर्षांपासून अखिल सौराष्ट्र महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजू कल्लाप्पा पाटील (मुळगाव कालकुंद्री ता. चंदगड जि. कोल्हापूर) मराठी बांधवांना घेऊन शिवजयंती साजरी करत आहेत. यात स्थानिक गुजराती लोकांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे. अखिल सौराष्ट्र महाराष्ट्रीयन मंडळ च्या माध्यमातून राजू पाटील व इतर जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी सौराष्ट्र सह गुजरात मधील प्रत्येक शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे केले आहेत. डॉ. राजू पाटील यांच्या पुढाकाराने व महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून सुरु झालेला शिवजयंती उत्सव आत्ता सौराष्ट्र मधील राजकोट, मोरबी, सुरेंद्रनगर, वेरावळ, भावनगर, जुनागड, जामनगर, अमरेली सह अहमदाबाद, वडोदरा,सुरत व कच्छ विभागातही पोहोचल्याची माहिती राजू पाटील यांनी दिली. शिवजयंती सारख्या सणांच्या माध्यमातून राजू पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी मराठी संस्कृती टिकवण्यासह महाराष्ट्रातून गुजरातमध्ये स्थाईक झालेल्या मराठी बांधवांचे मोठे संघटन करत त्यांना  आधार देण्याचे कार्य केले आहे. त्याची प्रचिती शिवजयंतीच्या माध्यमातून येत आहे. मोरबी शहरात शिवजयंती प्रसंगी पूजन करताना डॉ. राजू पाटील यांच्यासह चंद्रकांत ढेरे, घनश्याम सोळंकी, रमेश लिंगाडे, सुनील लिंगाडे, सुमित लिंगाडे, तुकाराम निकम, संपत पाटील, सचिन पाटील, सागर पाटील, प्रदीप पवार, दिनेश शेट्टी, रणजीत सोनार, रवी बनसोडे, पोपट पवार, समीर बनसोडे आदींसह मराठी गुजराती बांधवांची मोठी उपस्थिती होती. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची ची मिरवणूक काढण्यात आली.

No comments:

Post a Comment