![]() |
चंदगड येथील रवळनाथ देवाच्या यात्रेत पालखी सोहळयात झालेली भाविकांची गर्दी. |
येथील ग्रामदैवत व 84 खेड्यांचे श्रध्दास्थान श्री रवळनाथ देवाच्या यात्रेला आज उत्साहात सुरुवात झाली. सासनकाठी, आरती व पालखी मिरवणुकीसह हजारो भाविकांच्या गर्दीत यात्रा उत्सवाला आज प्रारंभ झाला. रविवारी (ता. 16) यात्रेची सांगता होणार आहे. चंदगड तालुक्यातील भाविकांसह आजरा, गडहिंग्लज, बेळगाव व गोवा येथील हजारो भाविकांनी या यात्रेला हजेरी लावत दर्शनासाठी मोठी रांग लावली होती.
सकाळपासूनच रवळनाथ मंदिराच्या परीसरात दुकानदारांनी दुकाने थाटली होती. लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी बाहेरगावाहून फिरते पाळणे, घसरगुंडी, फिरते पाळणे, मशीनवरील घोडे फिरणे आदी मनोरंजनाचे कार्यक्रम दिवसभर सुरु होते. चंदगडसह हिंडगाव, फाटकवाडी, हंबेरे, मांगलेवाडी, देसाईवाडी येथील गावची आज यात्रा असल्याने या गावातील लोक दिवसभर येथे थांबून होते. आपल्या संपूर्ण परिवारासह बाहेरगावाहून आलेले चाकरमानीही उपस्थित होते. यात्रेमध्ये महिलांची गर्दी दिसत होती. पालखी मिरवणूक मार्गात अडथळा येवू नये म्हणून स्वयंसेवक भक्तांनी मानवी कडे करुन भाविकांना सुचना देत होते. दुपारी साडेतीन युवकांनी सासनकाठीची मिरवणूक काढली. त्यानंतर पालखीच्या पाच प्रदक्षिणा मंदिराभोवती घालण्यात आल्या. यावेळी भाविक पालखी व सासनकाठीवर गुळ, खोबरे, बत्ताशे, चिरमुरे, लाडू यांची उधळण करत होते. मंदिराभोवती जिल्हा व सत्र न्यायाधीश वृशाली जोशी, न्यायालयीन व्यवस्थापक ऋती खांडे, प्रबंधक संभाजी पाटील, चंदगडचे न्यायाधीश ए. सी. बिराजदार, न्यायाधीश डी. एम. गायकवाड, नगराध्यक्षा प्राची काणेकर, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, पं. स. सदस्य दयानंद काणेकर, माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, बाबुराव हळदणकर, राजेंद्र परीट, अरुण पिळणकर यासह मंदिर कमिटीचे पदाधिकारी यांनी प्रदक्षिणा घातल्या. पालखी मिरवणुकीनंतर नारळ फोडण्यात आले. गुरुवारी चाळोबा यात्रा, शुक्रवारी सातेरी व भावेश्वरी यात्रा व शनिवारी इटलाई यात्रा होते.
No comments:
Post a Comment