इतिहास, संस्कृती आणि आदर्शवाद ही देशाची बलस्थाने - प्रा . राजा माळगी - चंदगड लाईव्ह न्युज

23 February 2020

इतिहास, संस्कृती आणि आदर्शवाद ही देशाची बलस्थाने - प्रा . राजा माळगी

'आता जागे होऊया ' या विषयावर व्याख्यान देताना प्रा.राजा माळगी व्यासपीठावर - डॉ.अनिल गवळी, डॉ . चंद्रकांत पोतदार, राजेंद्र शिवणगेकर , राहुल पाटील.
कार्वे / प्रतिनिधी
"जागतिकीकरणानंतर भारतीय समाज व्यवस्थेमध्ये अंतर्बाह्य परिवर्तने झाली. एकीकडे तंत्रज्ञान आणि विज्ञानाने अचंबित करणारी प्रगती केली. त्यामुळे तांत्रिक वस्तू स्वस्त झाल्या तर दुसरीकडे जीवनावश्यक वस्तुंची महागाई वाढली .  इतिहास, संस्कृती  आणि आदर्शवाद नष्ट करण्यासाठी काही व्यवस्थांची षड्यंत्रे कार्यरत आहेत. पण आपली बलस्थाने शाबूत ठेवण्याची जबाबदारी समाजाची आहे ." असे प्रतिपादन प्रा राजा माळगी यांनी केले.
ते मौजे कारवे ( ता. चंदगड ) येथील सरस्वती वाचनालयाने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत तिसरे पुष्प गुंफताना 'आता जागे होऊया ' या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. अनिल गवळी होते .प्रारंभी डॉ. चंद्रकांत पोतदार, राजेंद्र शिवणगेकर आणि राहुल पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सूर्याजी ओऊळकर यांनी तर पाहुण्यांचा परिचय पी.आर. मांडेकर यांनी करून दिला.
या वेळी कार्वे परिसरातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यामध्ये मराठी विद्यामंदिर मौजे कारवे, वैजनाथ पालेकर, अविनाश कांबळे , डॉ . उमा लक्ष्मण पाटील, नामदेव पाटील ,जॉनी फर्नांडीस, देवेंद्र सुळेभावकर, भरमाणा नाईक, विक्रम पाटील, प्रतिक्षा धामणेकर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
प्रा . माळगी पुढे म्हणाले की , "श्रमसंस्कृती घामावर आधारित होती. पण आज घाम विरहीत कामे करण्याकडे तरुणांचा ओढा आहे . तरुणांना आतून पोखरून टाकण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. दूरदर्शन आणि मोबाइल ही दुधारी शस्त्रे आहेत.त्यांचा वापर समाजाने विवेकबुद्धीने करायला हवा. " 
अध्यक्षीय भाषणात डॉ . अनिल गवळी म्हणाले की, "खुल्या आर्थिक धोरणामुळे भारतात अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. प्लॅस्टिक, कचरा, वृक्षतोड हे आजचे  अणुबॉम्ब बनले आहेत. या समस्यांना तोंड देण्यासाठी वैचारिक पिढी निर्माण व्हायला हवी . वैचारिक पिढी निर्माण करण्याचे काम वाचनालये करत असतात. त्यामुळे वाचनालयांचे कार्य मानवी जीवनात मोलाचे ठरले आहे. " 
याप्रसंगी एस. बी. ओऊळकर ,प्रकाश ज्योती दुकळे, नारायण पाटील, शिवाजी पाटील, महादेव दुकळे, प्रा सतीश माने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्तिक पाटील यांनी तर आभार विष्णू कार्वेकर आणि संयोजन डॉ. प्रकाश दुकळे यांनी केले.

No comments:

Post a Comment