ग्रामीण कवयित्री मुक्ता नावळे यांच्या जनजागृती काव्यसंग्रह प्रकाशन प्रसंगी बोलताना अखलाक मुजावर. |
मुक्ता नावळे या चंदगड तालुक्यातील आधुनिक बहिणाबाईच आहेत. वही पेन विकत घ्यायची सुद्धा आर्थिक स्थिती नसतानाही शेण काढताना, भांगलण करताना, भाकरी करताना, भांडी घासताना त्यांना सुचलेले काव्य, अभंग आपल्या भाषेत लिहून उच्चशिक्षित महिलांसाठीही त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक अखलाकभाई मुजावर (महागाव) यांनी केले. ते चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने चंदगड येथे मुक्ता पांडुरंग नावळे (नागवे, ता. चंदगड) लिखित 'जनजागृती' काव्यसंग्रहाच्या प्रकाशन व मराठी पत्रकार परिषद मुंबई चा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार संघ पुरस्कार प्राप्त चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित चंदगड लाईव्ह न्युज चॅनलच्या प्रथम वर्धापन दिन प्रसंगी व्याख्यान देत होते. अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे होते.
चंदगड येथे जनजागृती काव्यसंग्रह प्रकाशन करताना न्यायाधीश ए. सी. बिराजदार, भरमूअण्णा, समरजितसिंह घाटगे व मान्यवर. |
प्रास्ताविक उदयकुमार देशपांडे यांनी केले. स्वागत अनिल धुपदाळे यांनी केले. यावेळी पुढे बोलताना मुजावर म्हणाले नागवे येथील सातवीपर्यंत शिकलेल्या मुक्ताबाई प्रतिभाशाली कवयित्री आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे चंदगड न्यायालयाचे न्यायाधीश ए. सी. बिराजदार यांनी काव्यप्रतिभा लाभलेल्या शेतकरी गृहिणी मुक्ता यांच्या पहिल्याच काव्य संग्रहातील त्यांनी लिहिलेल्या कविता वाचकांना विचार करायला भाग पाडणाऱ्या आहेत. अशा शब्दात कौतुक केले. यावेळी बिराजदार यांच्यासह माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, नगराध्यक्षा सौ प्राची काणेकर, आदींच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. समरजितसिंह घाटगे, भरमुअण्णा पाटील, प्राची काणेकर, ॲड. संतोष मळवीकर, कवयित्री मुक्ता नावळे आदींची भाषणे झाली. न्यायाधीश बिराजदार यांच्यासह उपस्थितांनी मुक्ता यांना उत्स्फूर्त आर्थिक मदत दिली. कार्यक्रमास पंस. सदस्य दयानंद काणेकर, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष सुनील काणेकर, नगरसेवक सचिन नेसरीकर, दिलीप चंदगडकर, बाळासाहेब हळदणकर, संदीप सामंत, प्रा सुहास कुलकर्णी, बाबुराव हळदणकर, अनिल देवण, तानाजी वाघमारे, सोमनाथ गवस, गणेश फाटक, स्वप्नाली गवस, शांतारामबापू पाटील, पांडुरंग नावळे, शिक्षक नेते शंकर मनवाडकर, शिक्षक बँक संचालक शिवाजी पाटील, सदानंद पाटील आदींसह चंदगड तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र शिवणेकर यांनी केले. आभार श्रीकांत पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment