कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तुर्केवाडीत 1 ते 5 एप्रिलपर्यत पाच दिवसांचा कडकडीत बंद, दक्षता समितीचा निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

31 March 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तुर्केवाडीत 1 ते 5 एप्रिलपर्यत पाच दिवसांचा कडकडीत बंद, दक्षता समितीचा निर्णय

तुर्केवाडी गावात संचारबंदीमुळे सर्वत्र शांतता आहे. 
तुर्केवाडी (प्रतिनिधी)
देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असून त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर आंतरराज्य सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. तरी पंचक्रोशीत प्रमुख बाजारपेठ असल्याने आसपासच्या गावातील नागरिक हे वेगवेगळी कारणे दाखवून रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. तसेच गावातील नागरिक देखिल सायंकाळच्या दरम्यान साहित्य खरेदीच्या कारणाने गर्दी करत आहेत. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्यापासून (१ एप्रिल) तुर्केवाडीमधील सर्व किराणा दुकाने, दूध डेअरी, भाजीपाला विक्री, फळ विक्रेते, फेरीवाले, पीठ गिरणी असे सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय कोरोना दक्षता कमिटीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तरी तुर्केवाडी, यशवंतनगर, वैतागवाडी गावामध्ये त्याचे काटेकोर पालन करण्याच यावे असे आवाहन कमिटीतर्फे करण्यात आले आहे. याबाबत तुर्केवाडी ग्रामपंचायतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
तसेच या संचारबंदीच्या पाच दिवसामध्ये कोणत्याही कारणास्तव ग्रामस्थांनी बाहेर पडू नये. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या दुधाची गावात फिरून विक्री करू नये. तर पंचक्रोशीतील बाहेरगावातील लोकांनाही तुर्केवाडी, यशवंतनगर, वैताकवाडी गावामध्ये प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या निर्णयानुसार ग्रामस्थांनी संचारबंदीचे काटेकोर पालन करावे अन्यथा शासकीय नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे प्रसिद्धीपत्रकात नमुद करण्यात आले आहे. कोरोना दक्षता कमिटीच्या वतीने ग्रामपंचायत हद्दीतील तीनही गावामध्ये याबाबत माहिती देण्यात आली असून या निर्णयाबाबत निवेदनाच्या प्रती सर्व दुध डेअरी, व्यापारी, व्यावसाईक यांना देण्यात आल्याची माहिती पोलिस पाटील माधुरी दिगंबर कांबळे यांनी दिली.

No comments:

Post a Comment