कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर तीन दिवस कोवाड बाजारपेठ बंदचा निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

21 March 2020

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर तीन दिवस कोवाड बाजारपेठ बंदचा निर्णय


कोवाड / प्रतिनिधी   
राज्यातील कोरोना पोझिटीव्ह रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. या वाढीच्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यातील कर्यात भागातील कोवाड बाजारपेठ भविष्यात होणारा कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्याच्या हेतूने कोवाड (ता. चंदगड) येथील बाजारपेठ तीन दिवस बंद ठेवण्यासंदर्भात ग्रामस्थांच्या पुढाकाराने आज ग्रामपंचायत कोवाड येथे  कोवाड ग्रामस्थ, व्यापारी संघटना, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या उपस्थितीत आज  बैठक झाली. 
या बैठकीमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीकोनातून आणि सर्वांच्या आरोग्यासाठी हितावह अशा नियमावली तयार केली आहे. कोवाड व किणी हद्दीतील सर्व दुकाने रविवार 22  पासुन मंगळवार 24  पर्यंत  पुर्णतः बंद राहतील. या कालावधीत जी दुकाने सुरु राहतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, या कालावधीत सर्व रस्त्यावरील खासगी वाहतुक बंद राहील, दुध डेअरी रविवारी बंद राहिल, अत्यावश्यक सेवा मेडिकल दुकाने सोमवार मंगळवार सुरु राहतील, अत्यावश्यक सेवेसाठी ग्रामपंचायत कोवाडची परवानगी घेवुन दुकान उघडावे. बाहेरून विविध खेड्यातील लोक तसेच ग्राहक येत असल्यामुळे हा निर्णय घेणे भाग पडलेल्याचे यावेळी सांगण्यात आले. 
व्यापार आपण नंतरही करु शकतो पण कोरोनाची लागण एखाद्या व्यक्तीला झाली तर खुपच वाईट परिस्थिती निर्माण होईल, त्यामुळे आपण सर्वजण या बाजारपेठेसाठी व आपल्या कुटुंबासाठी महत्वपूर्ण आहात. त्यामुळे परिस्थिती समजुन घेवुन सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत आणि व्यापारी संघटना कोवाड यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी कोवाडच्या सरपंच अनिता भोगण, उपसरपंच विष्णू आडाव, ग्रामसेवक जी. एल. पाटील, रणजित भातकांडे, रामा वांद्रे, मारुती भोगण, पुंडलिक चोपडे, विष्णू बुरुड, पांडुरंग वांद्रे, राजाराम वांद्रे आधी ग्रामस्थ तर प्राथमिक आरोग्य केंद्र येथून डॉ. प्रसन्न चौगुले यांच्या वतीने एम पीडब्लू शैलेश वाघमारे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दयानंद सलाम, कल्लापा वांद्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर सायेकर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment