कोरोनाशी लढा देण्यासाठी खेड्यांनी लढविली अनोखी शक्कल - चंदगड लाईव्ह न्युज

24 March 2020

कोरोनाशी लढा देण्यासाठी खेड्यांनी लढविली अनोखी शक्कल

कोवाड (ता. चंदगड) येथील पुलावर काठ्या लावून बंद करण्यात आलेला रस्ता.
संजय पाटील, कोवाड / प्रतिनिधी    
कोरोणाचा प्रादुर्भाव वाढतोय, रुग्णांची संख्या देखील दिवसागणिक वाढतच आहे. अशा वेळी पहिल्यांदा जमावबंदी आणि आता संचारबंदी राज्यामध्ये आता लागू करण्यात आली आहे. कोरोनाची धास्ती आता शहरातल्या लोकांबरोबरच ग्रामीण भागातल्या गावातील लोकांनीही अगदी मोठया प्रमाणात घेतली आहे.  त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी खबरदारी म्हणून कोरोनाशी लढा देण्यासाठी गावात प्रवेश करणाऱ्या सर्व सीमा लाकडी ओडके, चरी, दगड व मातीचा भराव टाकून बंद केल्या आहेत. कोरोनाची दशहत पाहता खेड्यांनीही स्वत:ची काळजी स्वत: घेतल्याचे चित्र कोवाड परिसरासह चंदगड तालुक्यात आहे. 
कोवाड-दुंडगे रोडवर बाबु व ओडके टाकून रस्ता बंद केला आहे. 
कोरोनाचा विषाणु पसरु नये यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्याच काम सर्वतोपरी सुरु आहे. मात्र नागरीकांच्याकडून अपवाद वगळता चांगला प्रतिसाद मिळत आहे. कामानिमित्त शहरात राहणारे गावातील अकेकजण कोरोनाच्या भीतीपोटी घरच्यांच्या बोलवण्यावरून आपापल्या घरी परतली आहेत. त्यांच्या सर्व तपासण्या करूनच त्यांना गावात घेण्यात आला आहे. चुकूनही कोरोनाचा एकही संशयित किंवा रुग्ण गावात येऊ नये म्हणून गाव पातळीवर खबरदारी घेतली जात आहे. प्रत्येक गावामध्ये गावातील नागरिकांना कोरोनाचा होणारा प्रादुर्भाव, संसर्ग होऊ नयेय यासाठी त्या-त्या गावातील प्रतिनिधी मंडळी आणि तरुणांनी अनोखी शक्कल लढविली आहे. सर्व गावातील येणारे जाणारे रस्ते हे बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 
शिनोळी येथे रस्त्यावर टाकलेली माती.
गावातून कोणत्याही प्रकारची वाहतूक होणार नाही याची खबरदारी हि घेतलेली आहे. थोडक्यात काय तर प्रत्येक गाव सेल्फ कॉरंटाईन घेत असल्याचे चित्र हे आज दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, चंदगड, आजरा या तालुक्यातील लोकांनी जरा जास्तच खबरदारी घेतली आहे. कितीतरी गावामध्ये गावच्या सीमेवर पाईप, मोठे दगड, प्रसंगी रस्त्यावर झाडाचे ओडके टाकून वाटा बंद केल्या जात असल्याचे चित्र सद्या पहायला मिळत आहे. लोकांची चौकशी करूनच अत्यावश्यक काम असेल तरच लोकांना बाहेर किंवा आत मध्ये प्रवेश हा दिला जात आहे. जी बाहेरगावची लोकं हि गावामध्ये येत आहेत त्यांची चाचणी तसेच खात्री करूनच गावामध्ये प्रवेश हा दिला जात आहे. सद्याच्या स्थितीत असं जाणवत आहे की, सर्व लोक आताच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आहेत. त्यांच्या मनात जागृती निर्माण झाली आहे. पण कुठं तरी आपलं गाव सुरक्षित रहावं, आपल्या गावातील नागरिक हे कोरोना पासून लांब रहावे.  यासाठी प्रत्येक गावातील तरुण वर्ग काळजी  घेत असल्याचे चित्र आज सगळीकडे बघायला मिळत आहे. गजबजलेली सगळी गाव हि आता शांत आहेत. एकूणच काय तर कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सगळी गाव आता सज्ज झाली आहेत आणि प्रत्येक घटकांनी असे प्रयत्न केलं तरच आपण कोरोना च्या लढ्याला यशस्वी तोंड देऊ शकतो.

No comments:

Post a Comment