संचारबंदीतही कोवाड बाजारपेठेत अनेकांचा खुलेआम संचार, घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाईची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

27 March 2020

संचारबंदीतही कोवाड बाजारपेठेत अनेकांचा खुलेआम संचार, घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाईची मागणी


अशोक पाटील /कोवाड
लॉकडाउनच्या पार्श्वभमीवर कोवाड परिसरातील अनेक गावानी आपल्या गावाच्या सीमा बंद केल्या आहेत . मात्र कोवाड बाजारपेठेत लोकांची गर्दी होताना दिसते. सकाळी व संध्याकाळच्या सत्रात मोठ्या संख्येने लोक बाजारपेठेत येत आहेत. दुकानांच्यासमोर गर्दी करत आहेत. फेरफटका मारणाऱ्यांची संख्या वाढत आहे . त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. बाजारपेठेत पोलिसांची संख्या वाढवून घराबाहेर पडणाऱ्यांच्यावर कारवाई करावी, अशी नागरीकांच्यातून मागणी होत आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन देशभर २१ दिवसाचा लॉकडाउन केला आहे. संचारबंदीच्या काळात लोकानी घराबाहेर पडून नये, यासाठी प्रशासनाच्यावतीने शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. गेल्या आठ दिवसात पुणे, मुंबई यासह परदेशातून मोठ्या संख्येने लोक ग्रामीण भागात आले आहेत . प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्राथमिक तपासणीनंतर हे लोक घरी परतले आहेत. प्रत्यक्षात अशा लोकानी १४ दिवस घराबाहेर पडू नये, असे असताना यातील अनेक लोक गावातून खुलेआम फिरत आहेत. बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यात दोन रुग्ण आढळल्याने प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनीही गावपातळीवर खबरदारी घेण्याच्या ग्रामपंचायतीना सुचना केल्या आहेत. त्यानुसार कोवाड परिसरातील अनेक गावांनी बाहेरून येणाऱ्याना गावात मञ्जाव केला आहे . आपापल्या गावच्या सीमा बंद करुन गाव क्वारंटाईन केली आहेत. पण शेजारच्याच गावांतील लोकांची कोवाड बाजारपेठेत गर्दी होताना दिसते.
कोवाड बाजारपेठ तालुक्यात मोठी असल्याने परिसरातील अनेक लोक बाजाराच्या निमित्ताने बाजारपेठेत येत आहेत. हे जरी खरे असले तरी त्यांच्याकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याने चित्र आहे. दररोज सकाळी व संध्याकाळच्या सत्रात लोकांची गर्दी वाढत आहे. कांही दुकानदारानी डिस्टन्सिंग पध्दतीने विक्री सुरु केली आहे. पण अनेक ठिकाणी अचानक गर्दी होत आहे. तसेच बाजारात खुलेआम फिरणाऱ्या लोकांच्याकडे पाहिले की अजूनही येथे कोरोनाचे मनावर घेतल्याचे दिसत नाही. पोलिस यंत्रणाही कमी असल्याने यावर नियंत्रण कमी झाले आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ यावर नियंत्रण आणावे, अशी नागरिकांच्यातून मागणी होत आहे.No comments:

Post a Comment