महापुरातील शेतीच्या नुकसानीपासून वंचित शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

21 March 2020

महापुरातील शेतीच्या नुकसानीपासून वंचित शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी


चंदगड / प्रतिनिधी 
गेल्या ऑगस्ट/सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांची पिके कुजून  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र योग्य पंचनामे झाले नसल्याने शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई योग्य प्रमाणात नुकसान भरपाई  मिळाली नाही. नदीकाठी शेती असलेल्या ज्या शेतकऱ्यांचा ऊस शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, त्या शेतकर्याना  काहीच भरपाई मिळालेली नाही. याउलट माळरानात शेती असलेल्या शेतकऱ्यांना 
मात्र मोठ्या प्रमाणात भरपाई मिळालेली आहे. त्यामुळे खरोखर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे. त्यामूळे या नुकसान भरपाई पासून वंचित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा बसर्गे गावच्या शेतकऱ्यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आल्या आहेत.
महापुरामुळे ऊस, भात, नाचना व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यावेळी प्रत्यक्षात पंचनामे करण्यासाठी शासनाने कृषी अधिकारी, कृषी सेवक, ग्रामसेवक, तलाठी, सर्कल यांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र या अधिकाऱ्यांनी शेतीचे पंचनामे न करता आपल्या घरीच बसून पंचनामे केले आहेत. नदीकाठाला जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांची नावे न घालता इतर जमिनींचे सर्वे केले आहेत. चुकीचे पंचनामे करणाऱ्या  अधिकाऱ्यांची चौकशी केली जावी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा अन्यथा येत्या चार दिवसांत आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा पूरग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे. निवेदनावर रामचंद्र जानबा पाटील, पुंडलिक रामू खामकर, भागोजी लांडे, महादेव कांबळे, रामचंद्र पाटील, यल्लुबाई पाटील, लक्ष्मीबाई कुट्रे, कृष्णा बेनके आदीसह बहुसंख्य  शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment