सीमेवरील गावांमध्ये कोरोना दक्षता समित्या सतर्क, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

28 April 2020

सीमेवरील गावांमध्ये कोरोना दक्षता समित्या सतर्क, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

तुर्केवाडी गावच्या सीमेवर दक्षता कमिटीचा पहारा
तुर्केवाडी (प्रतिनिधी) : 
कर्नाटक सीमाभागात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने चंदगड तालुक्यात मोठ्याप्रमाणात खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यापासून बचावात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. बेळगाव सीमेजवळ असलेल्या बहुतेक सर्व गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना दक्षता समित्या या अधिक खबरदारी घेत आहेत. अनेक गावे सील करण्यात आली असून बेळगावशी असलेला सर्व व्यवहार बंद करण्यात आला आहे. कोणत्याही कारणासाठी बेळगावला जाण्याची परवानगी दिली जात नाही. त्यामुळे सर्व जीवनावश्यक साहित्याची खरेदी गडहिंग्लज बाजारपेठेतून केली जात आहे.
कोरोनाचा हा वाढत धोका पाहता सिमपासून काही अंतरावर असलेल्या तुर्केवाडी गावामध्ये देखील सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. गावाच्या सीमा बंद करण्यात आल्या असून दक्षता कमिटीचे सदस्य पहारा देत आहेत. तर सार्वजनिक ठिकाणी जसे की रास्त धान्य दुकान, बँक ऑफ महाराष्ट्र या गर्दीच्या ठिकाणी लोकांना सोशल डिस्टनसिंग पाळण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात आहेत. 
याबाबत पोलीस पाटील माधुरी कांबळे म्हणाल्या की, बेळगावच्या सिमभागात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने  कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता गावाच्या सर्व सीमा लॉक केल्या आहेत. प्रत्येक सीमेवर कोरोना दक्षता समितीचे सदस्य नियुक्त करण्यात आले असून सर्व वाहन आणि नागरिकांची चौकशी करूनच प्रवेश दिला जात आहे. तसेच तहसीलदार व उपविभागीय कार्यालयाच्या सूचनांनुसार सीमाबंदी आणि जिल्हाबंदी आदेशाचे सक्तीने पालन केले जात आहे. संचारबंदी, वाहनबंदी असल्याने विनाकारण फिरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. 
यावेळी गावकामगर पोलीस पाटील माधुरी कांबळे, सरपंच रुद्राप्पा तेली, उपसरपंच अरुण पवार, ग्रामसेवक अशोक पाटील, कोरोना दक्षता कमिटीचे चेतन बांदिवडेकर, जोतिबा गावडे, प्रकाश सौदागर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी गावामध्ये फिरून मास्क वापरणे, सोशल डिस्टनसिंग, सॅनिटायझरचा वापर याबाबत जनजागृती करत आहेत. तर पोलीस कॉन्स्टेबल श्रीनाथ मेगुलकर यांनी आपला खाक्या दाखवत बँक परिसरात तसेच बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली.

                                              बँक ऑफ महाराष्ट्रचा स्तुत्य उपक्रम
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये दररोज अनेक नागरिक व्यवहार करायला गर्दी करत आहेत. बँक प्रशासनाकडून त्याठिकाणी सोशल डिस्टनसिंग पाळण्यात येत असून लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे लोकांना बँकेच्या बाहेर उन्हामध्ये उभे राहावे लागत असल्याचे लक्षात येताच बँकेने समोर सावलीसाठी मंडप उभारला आहे. या स्तुत्य उपक्रमामुळे बँकेत येणाऱ्या ग्राहकांना सावली मिळाल्याने संधान व्यक्त होत आहे. अशाप्रकारे कोरोनाच्या या संकट समयी सर्व सार्वजनिक संस्थांनी सामाजिक भान ठेवण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment