डॉ. एकनाथ पाटील (अध्यक्ष चंदगड तालका मेडिकल असोसिएशन) |
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर देशात लॉकडाउन सुरु असला तरी अन्य रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी चंदगड तालुक्यातील सर्व खासगी दवाखाने सुरु ठेवले आहेत. पण दरम्यानच्या काळात तालुक्यातील खासगी दवाखाने बंद असल्याच्या अफवा पसरल्या होत्या, त्यामध्ये तथ्य नसल्याची माहिती चंदगड तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एकनाथ पाटील यांनी दिली. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने २१ दिवसांचा देशात लॉकडाउन सुरु केला आहे. पण खासगी दवाखाने सुरु ठेवण्याच्या शासनाने सुचना केल्याने चंदगड तालुका मेडिकल असोसिएशनने दररोज दुपारी २ वाजेपर्यंत तालुक्यातील सर्व ओपीडी चालू ठेवल्या आहेत. त्यानंतर येणाऱ्या केवळ सिरियस रुग्णाना आरोग्य सेवा देण्यासाठी डॉक्टर उपलब्ध असणार आहेत. कोणत्याही रुग्णांची हेळसांड होऊ नये. तात्काळ त्याना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी. यासाठी सर्व स्थानिक पातळीवरील डॉक्टरांचे फोन नंबर त्या त्या ग्रामपंचायतीच्या दक्षता समितीकडे दिले आहेत. असोसिएशनच्यावतीने तालुक्यातील आरोग्य सेवा सक्षम ठेवण्यावर भर दिल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. कोरोना संसर्गाच्या दृष्टीकोणातून विचार केला तर ग्रामीण पातळीवर काम करणाऱ्या डॉक्टरांच्याकडे कोरोनाच्या दृष्टीने स्वतःसाठी सुरक्षिततेच्या कोणत्याच सविधा नाहीत. तसेच दवाखान्याना औषधांचा पुरवठा करणारे विक्रेतेही बंद झाल्याने दवाखान्यातून औषधांची कमतरता भासत आहे. तरीही डॉक्टर ओपीडी सुरू करून आरोग्य सेवा देत आहेत. तीन पदर असलेले एन - ९५ मास्क, हॅण्डग्लोज, सेफ्टी किट असे साहित्य उपलब्ध नसल्याने डॉक्टराना रुग्ण हाताळताना अडचणी येत आहेत. डॉक्टर सेफ्टी किट विकत घेण्यास तयार आहेत. पण ते मिळत नसल्याने शासनाने खासगी डॉक्टराना सेफ्टी किट उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याचे सांगून डॉ. पाटील यांनी लोकानी अफवांवर विश्वास ठेवू नये चंदगड तालुक्यातील लोकाना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी असोसिएशन कटिबध्द राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment