कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डुक्करवाडीत दोन दिवस कडकडीत बंद - चंदगड लाईव्ह न्युज

02 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डुक्करवाडीत दोन दिवस कडकडीत बंद

डुक्करवाडी गावात दोन दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता. 
चंदगड  /  प्रतिनिधी
देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असून त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात  लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातही संचारबंदी लागू करण्यात आली आहे . तर आंतरराज्य सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यातील डूक्करवाडी( रामपूर) ता.चंदगड येथील  बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.तसेच गावातील नागरिक देखिल सायंकाळच्या दरम्यान साहित्य खरेदीच्या कारणाने गर्दी करत आहेत. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुरूवार दि.2 एप्रिल ते  शुक्रवार दि.3एप्रिल पर्यंत डूक्करवाडी( रामपूर) येथील  सर्व किराणा दुकाने , दूध डेअरी , भाजीपाला विक्री , फळ विक्रेते , फेरीवाले , पीठ गिरणी असे सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय कोरोना दक्षता कमिटीच्या बूधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. गावामध्ये बंदकाळात नियमांचे  काटेकोर पालन करण्यात यावे असे आवाहन कमिटीतर्फे करण्यात आले आहे. या संचारबंदीच्या दोन दिवसामध्ये कोणत्याही कारणास्तव ग्रामस्थांनी बाहेर पडू नये . तसेच शेतकऱ्यांनी आपल्या दुधाची गावात फिरून विक्री करू नये. तर पंचक्रोशीतील बाहेरगावातील लोकांनाही डूक्करवाडी  गावामध्ये प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या निर्णयानुसार ग्रामस्थांनी संचारबंदीचे काटेकोर पालन करावे अन्यथा शासकीय नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले.

No comments:

Post a Comment