![]() |
कोवाड : ग्रामीण भागात भाजी विक्रेते अशी टेंपोतून भाजी आणून विक्री करत आहेत. |
कोवाड / प्रतिनिधी
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे . नागरिकांना घरातून बाहेर पडू नका, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, तोंडाला मास्क वापरा, हात स्वच्छ धुवा, असे प्रशासनाच्यावतीने आवाहन केले जात आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवांवगळता अन्य सर्व सेवा व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. पण भाजीपाला अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने ग्रामीण भागातील भाजीपाला विक्रेते कोरोनाच्या लढ्यात भर उन्हात गावागावांतून फिरुन घरपोच भाजीपाल्याची सेवा देत आहेत.
कोरोनाच्या या संकटामुळे ग्रामीण भागातील भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत . बाजारपेठा बंद असल्याने शेतात पिकलेल्या भाजीपाल्याचे मोठे नुकसान होत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने गावं गावं होम क्वारंटाईन होत आहेत. गावच्या सीमा बंद केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवरही बाजीपाला विक्री करणे शेतकऱ्याना अडचणीचे झाले आहे. त्यामुळे कांही भाजीपाला विक्रेते शेतात जाऊन शेतकऱ्यांच्याकडून भाजीपाला विकत घेत असल्याने शेतकऱ्याना दिलासा मिळाला आहे. मिळेल त्या दराने शेतकरीही भाजी विक्रेत्याना भाजीपाला विकत आहेत. भाजीपाला विक्रेतेही परिसरात फिरुन घरपोच भाजीपाला विकत आहेत. भाजीपाल्याची मागणी अधिक असतानाही भाजी विक्रेते सोशल डिस्टन्सिंग पाळून योग्य भावात भाजीपाला देण्याचा प्रयत्न करत आहेत. हातगाडी व टेंपोतून विक्रेते गावागावात जाऊन विशिष्ट अंतर ठेवून ग्राहकाना भाजीपाला देत आहेत. यामध्ये ते स्वतःच्या सुरक्षेसाठी मास्क, हॅन्डग्लोजचा वापर करताना दिसत आहेत. शहरी भागात अजूनही भाजी मंडईतून गर्दी होत असताना दिसते. पण ग्रामीण भागात भाजी विक्रेते घरपोच भाजीपाला विक्री करत असल्याने नागरिकांचे घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
भाजी विक्रीचा माझा मुळ व्यवसाय नाही. पण लॉकडाउनच्या काळात भाजी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होताना दिसत होती. त्यामुळे शासनाची परवानगी काढून मी परिसरातील शेतकऱ्यांच्याकडील भाजीपाला विकत घेऊन तो गावागावातून फिरुन घरपोच करत आहे. तसेच मोबाईवरुन भाजीसाठी ऑडरी येत आहेत. त्यानुसार भाजीपाला घरपोच करत असल्याचे भाजीपाला विक्रेता अशोक मनवाडकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment