लाॅकडाऊनमुळे शेतीमालाची गावा-गावातच होतेय विक्री, सोयीमुळे ग्राहकांतून समाधान - चंदगड लाईव्ह न्युज

14 April 2020

लाॅकडाऊनमुळे शेतीमालाची गावा-गावातच होतेय विक्री, सोयीमुळे ग्राहकांतून समाधान

करोनाच्या संकटामुळे नांदवडे (ता. चंदगड) येथे घरातच शेतातील मालाची अत्यल्प दराने विक्री करताना शेतकरी सुनिल शिंदे.
कोवाड / प्रतिनिधी
महापूराच्या संकटातून सावरणाऱ्या कोवाड परिसरातील शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी भाजीपाला उत्पादनावर भर दिला होता. भाजीपाला काढणीच्यावेळीच अचानक कोरोनाचे संकट ठाकल्याने पुन्हा येथील शेतकरी संकटाच्या फेऱ्यात अडकला. लॉकडाउनमुळे बाजारपेठा बंद झाल्या. गावा गावांच्या सीमा बंद करण्यात आल्या. अशा कठीण परिस्थितीत शेतात पिकलेल्या भाजीपाल्याचे काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असताना कृषी विभागाने भाजीपाला विक्रीसाठी शेतकऱ्यांना वाहनांचे परवाने दिले. त्यामुळे संबंधीत शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवर भाजीपाल्याची विक्री करुन मोठे संकट दूर केले आहे. 
लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. शेतीमालाचे उत्पादन हे हंगामी असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. गेल्या वर्षी महापूरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले. उभी पिकं पूरातून वाहून गेली. अशा परिस्थितीतूनही शेतकरी सावरत असताना आता कोरोनाच्या दुसऱ्या संकटात सापडला आहे. कोवाड व माणगांव परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी मिरची, भेंडी, बटाटे, वांगी, ढबू मिरची, कोबी अशा प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेतले होते. ऐन काढणीच्यावेळी कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमिवर शासनाने देशात लॉकडाउन केला. यामुळे बाजारपेठा बंद झाल्या. नाकाबंदीमळे वाहतूक बंद झाली. खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक गावांनी आपल्या गावच्या सीमा बंद केल्या. अशा परिस्थितीत भाजीपाल्याचे उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांची धास्ती वाढली. वेळेत भाजीपाला काढून विकला नाही तर शेतातचं तो कुजून जाणार. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होणार म्हणून शेतकरी चिंतेत होता. संबंधीत शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून भाजीपाला विक्रीबाबत म्हणणे मांडले. त्यानुसार कृषी विभागाने भाजीपाल्याचे उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर भाजीपाला विक्री करता यावा यासाठी वाहनांचे परवाने काढून दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक परिसरात फिरुन भाजीपाला विक्री करण्याला सुरवात केली. काही शेतकऱ्यांनी आपल्या घरीच भाजीपाला विक्रीची दुकाने थाटली. सोशल मिडियामार्फत नागरिकांना भाजीपाल्याची माहिती देऊन ग्राहक मिळविण्याचाही प्रयत्न केला गेला. संचारबंदीमुळे भाजीपाल्याला मागणीही मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली होती. वाढत्या मागणीचा शेतकऱ्यांनी चांगला लाभ उठविल्याने भाजीपाला शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे नुकसान होऊ नये म्हणून कृषी विभागामार्फत भाजीपाला विक्रीसाठी शेतकऱ्यांना परवाने देऊन विक्री व्यवस्थेसाठी सहकार्य करण्यात आले आहे. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यानी स्थानिक पातळीवर योग्य भावाला भाजीपाला विकला आहे. असे कृषी सहाय्यक एस. डी. मुळे यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment