नितीन दत्तात्रय रेवडेकर |
काजू बागेकडे जात असताना अचानकपणे गव्याने हल्ला केल्याने बुझवडे (ता. चंदगड) येथील नितीन दत्तात्रय रेवडेकर (वय-34) हे जखमी झाले आहेत. आज सकाळी दहाच्या दरम्यान हि घटना घडली. बुझवडे येथील पाणंद रस्त्याच्या वरच्या बाजूला गावातील असलेल्या शेताजवळ हि घटना घडली. घटनेची माहीती वनविभागाला मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.
यासंदर्भात माहीती अशी - बुझवडे या परिसरात गव्यांचा वावर नेहमीचाच आहे. आज सकाळी 9 वाजता नितीन दत्तात्रय रेवडेकर युवक आपल्या काजू बागेकडे जात असताना गावच्या पानंद रस्त्याच्या वरच्या बाजूला वाडीचे मळ शेतात गट नंबर 209 मध्ये कुलदीप दळवी यांचे शेतातील वाटेवर गव्याने अचानक हल्ला करून त्यांना जखमी केले. त्यांच्या पाठीत गव्याचे शिंग लागल्याने ते जखमी आहेत. चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयात उपचार करुन पुढील उपचारासाठी त्यांना गडहिग्लज येथील खाजगी रुग्णांलयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. चंदगड वन विभागाचे वनक्षेत्रपाल डी. जी राक्षे, वनपाल दयानंद पाटील, ए. जे. वाझे, वनरक्षक के. एस. पताडे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर घटनेचा पंचनामा केला. चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वरती नेहमीच गव्याचे हल्ले होत असल्याने सध्या काजू बाग राखणाऱ्या काजू बागायतदार शेतकऱ्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
No comments:
Post a Comment