बँक ऑफ इंडिया चंदगडच्या वतीने नांदवडे येथे सरकारच्या विविध योजनेतील रकमेचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

28 April 2020

बँक ऑफ इंडिया चंदगडच्या वतीने नांदवडे येथे सरकारच्या विविध योजनेतील रकमेचे वाटप

नांदवडे (ता. चंदगड) येथे बँक ऑफ इंडिया चंदगड शाखेमार्फत लाभार्थ्यांना खात्यातील रकमेचे वाटप करताना दिपक माईनकर, शेजारी शाखा व्यवस्थापक अमित मिश्रा, कर्मचारी प्रतिक बावनकर, सरपंच संज्योती मळवीकर व इतर. 
चंदगड / प्रतिनिधी
नांदवडे (ता. चंदगड) येथे करोनाच्या पार्श्वभूमीवर बँक ऑफ इंडिया चंदगड शाखेमार्फत गावातील माऊली मंदिर येथे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, उज्वला योजना व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना या जनधन योजनेतील खातेदारांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम तालुक्यात सर्वप्रथम नांदवडे गावामध्ये खातेदारांच्यासमक्ष वाटप करण्यात आली. रकक्म देताना सुरक्षित वावर ठेवून हि रक्कम देण्यात आली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे बँकींग व्यवहारालाही मर्यादा येत आहेत. खातेदारांच्या जनधन व अन्य बँकेच्या खात्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, उज्वला योजना व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना या खात्यामध्ये सरकारच्या वतीने विविध योजनेखाली रक्कम जमा करण्यात आली आहे. देशात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे सर्व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. शेतातील पिकेही बाजारपेठ उपलब्ध नसल्याने जागीच खराब होत आहेत. खायचं काय असा प्रश्न लोकांच्यासमोर आहे. त्यामुळे सरकारमार्फत जमा झालेल्या पैशातून सद्यस्थितीला उदरनिर्वाह करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. बँकेतून रक्कम काढण्यासाठी खातेदार बँकेच्या बाहेर गर्दी करत असल्यामुळे लांबच-लांब रांगा दिसत आहेत. महिला व वयोवृध्दांना तासनतास रांगेत उभे राहणे शक्य नाही. नांदवडे हे गाव जास्त लोकसंख्येचे असून या गावातील सर्वच लोकांचे व्यवहार हे बँक ऑफ इंडियामध्ये आहेत. बँकेबाहेर गर्दी करणाऱ्यांमध्ये नांदवडे गावातीलही लोक आहेत. नांदवडेहून चंदगडला येण्यासाठी वाहतुकीची सोय नसल्याने व सर्वांच्याकडे स्वत:चे वाहन नसल्यामुळे अनेक ग्राहकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे बँकेच्या चंदगड शाखेच्या वतीने लोकांची सोय व्हावी व त्यांना गरजेला वेळेत पैसे मिळावेत या उद्देशाने आज नांदवडे गावातील माऊली मंदिर येथे बँक ऑफ इंडिया शाखा चंदगडच्या वतीने ग्राहकांना त्यांच्या खात्यातील रक्कम काढून देण्यात आली. दिवसभरात 157 खातेधारकांनी याचा लाभा घेतला. यावेळी नांदवडेच्या सरपंच संज्योती मळविकर, बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापक अमित मिश्रा, कर्मचारी प्रतिक बावनकर, दीपक माईनकर उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment