पाटणे फाटा औद्योगिक वसाहतीतील निराधार २३ कुटुंबांना व्यावसाईकांची मदत - चंदगड लाईव्ह न्युज

28 April 2020

पाटणे फाटा औद्योगिक वसाहतीतील निराधार २३ कुटुंबांना व्यावसाईकांची मदत

रविकिरण पेपर मिल्स हलकर्णी, स्ट्रॉंगटाईस ग्रुप बेळगाव, डॉक्टर्स ग्रुप व सेजल कॉम्प्लेक्सच्या पुढाकाराने किराणा किटचे वाटप
पाटणे फाटा येथील गरजुंना जीवनावश्यक वस्तुची मदत करताना व्यावसायिक.
तुर्केवाडी (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ताळेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प आहेत. अशात पाटणे फाटा येथील औद्योगिक वसाहतीच्या परिसरात रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना हाताला काम नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. औद्योगिक वसाहत असल्याने याठिकाणी फिरून मिळेल ते काम करुन उदरनिर्वाह करणारी जवळपास २३ कुटुंबे राहतात. अशा कुटुंबांचे लॉकडाऊनच्या काळात हाल होत असल्याचे लक्षात आल्यावर येथील काही जागरुक नागरिकांनी एकत्र येत त्यांना आधार दिला आहे.
रविकिरण पेपर मिल्स हलकर्णी, स्ट्रॉंगटाईस ग्रुप बेळगाव, डॉक्टर्स ग्रुप शिनोळी व पाटणे फाटा, सेजल कॉम्प्लेक्समधील व्यावसाईक यांनी एकत्र येत सामाजिक बांधिलकीतून या निराधार कुटुंबांना किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे किटची मदत केल्याचे डॉक्टर एन.टी. मुरकुटे यांनी सांगितले. या सहकार्यातून त्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न तात्पूरता सुटला आहे. त्यामुळे या कुटुंबांनी समाधान व्यक्त केले.
पाटणे फाटा येथे औद्योगिक वसाहत आणि बाजारपेठेमुळे बाहेरील अनेक लोक याठिकाणी येवून उदरनिर्वाह करत आहेत. हाताला काम मिळत असल्याने या परिसरात रोजंदारीवर काम करणारी अनेक कुटुंबे झोपड्या बनवून राहत आहेत. मात्र, सध्या कोरोनाच्या संकटकाळात संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व व्यावसाय, उद्योग आणि व्यवहार बंद आहेत. त्यामुळे दररोज कमवून खाणाऱ्या या निराधार कुटुंबांना दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीची येथील सेजल कॉम्प्लेक्स या व्यावसाईक संकुलातील काही नागरिकांना माहिती मिळताच डॉक्टर्स, व्यावसाईक एकत्र येत त्यांनी मदतीचा हात पुढे केला. या मदतीतून या परिसरातील २३ कुटुंबांना किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करुन देण्यात आले. या मदतीतून या कुटुंबांचा काही दिवसांचा तरी प्रश्न मिटला आहे.

No comments:

Post a Comment