मतदारसंघातील पुणे-मुंबईकरांना गावी आणण्यासाठी आमदार राजेश पाटील यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

28 April 2020

मतदारसंघातील पुणे-मुंबईकरांना गावी आणण्यासाठी आमदार राजेश पाटील यांना निवेदन

तेऊरवाडी / प्रतिनिधी
चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील अनेक लोक रोजगार, शिक्षण व व्यवसायासाठी पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक मोठ्या शहरात वास्तव्याला आहेत. करोनाच्या संकटामुळे हे सर्व लोक लॉकडाऊनमध्ये अडकले आहेत. लॉकडाऊन कधी संपेल हे सांगता येत नाही. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या पुणे, मुंबईसह राज्यातील चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील बाहेरगावी असलेल्या नागरीकांनी रितसर परवानगी घेऊन आम्हाला आपल्या आपल्या गावी जाण्याची व्यवस्था करावी. अशा मागणी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
यामध्ये  आज करोनाचा महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. त्यात देश, राज्य आणि आपले गाव सुध्दा आहे. देशभर लागू केलेली संचारबंदी आणि दिवसेदिवस गडद होत असलेले कोरोनाचे संकट. यामुळे आमच्यासह आमचे कुटुंबिय अडचणीत सापडले आहेत. चंदगड विधानसभा मतदार संघातील बरेच लोक रोजीरोटीच्या निमित्ताने मुंबई व आजूबाजूच्या परीसरामध्ये आहेत. कोण भाड्याच्या रूम मध्ये तर कोण मंडळाच्या रूम मध्ये,  दाटीवाटीने तर कोणी स्वतः च्या वैयक्तिक रूममध्ये वास्तव्यासाठी आहेत. करोनाच्या प्रादुर्भाव इतका भयंकर आहे कि घराबाहेर पडता येत नाही किंवा कामावर पण जाता येत नाही, अशी भिषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आमच्या हातामध्ये जे काही  पैसा होते तेही आता संपले आहेत. या संपूर्ण परिस्थितीमुळे रूमभाडे, राशनपाण्याची सोय करताना खुप अडचणी निर्माण होत आहेत. गावाकडून आणलेले  अन्नधान्य आता संपत आले आहे. काही जन आपल्या कुंटूबासोबत तर कोणी एकटेच मंडळाच्या रूममध्ये राहत आहेत. परंतु आमचे आईवडील गावी एकटेच घरी राहत आहेत. गावाकडील आई-वडील आमच्या काळजीत आहेत, त्यांच्यावर मानसिक दडपणामुळे ते आजारी पडत आहेत. या सगळ्या मुळे आम्ही हतबल झालो आहोत. 
3 मे पासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणायची असा मानस मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांनी बोलून दाखवला आहे. त्या अनुषंगाने आपल्या मतदार संघातील चंदगड, आजरा, गडहिंग्लज मधील मुंबई व आजूबाजूच्या नगरामध्ये  वास्तव्यास असणाऱ्या लोकांच्या आग्रहाखातर तुम्ही स्वतः यामध्ये लक्ष घालावे. सरकारी पातळीवर सर्व त्या रितसर आम्हाला आपल्या गावी जाण्याची व्यवस्था करून द्यावी. अशी मागणी या निवेदनातून केली आहे.


No comments:

Post a Comment