सरकारी जंगलातील अवैध वृक्षतोड प्रकरणी कानुर खुर्द येथील दहा जणांवर गुन्हा - चंदगड लाईव्ह न्युज

24 April 2020

सरकारी जंगलातील अवैध वृक्षतोड प्रकरणी कानुर खुर्द येथील दहा जणांवर गुन्हा

चंदगड / प्रतिनिधी
        चंदगड वनपरिक्षेक्षाअंतर्गत येणाऱ्या नियतक्षेत्र कानुर खुर्द (ता. चंदगड) येथील जंगल सर्व्हे नं. 121 मध्ये सरकारी जंगलात अवैध वृक्षतोड करण्यात आली. यामध्ये कानुर खुर्द येथे ट्रॅक्टर व ट्रॅलीमधील जळाऊ लाकडासह अंदाजे 4 लाख 33 हजार 153 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी कानुर खुर्द येथील ट्रॅक्टर वाहन मालकासह दहा जणांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 22 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हि घटना घडली. याबाबतची माहीती चंदगडचे वनक्षेत्रपाल डी. जी. राक्षे यांनी दिली. 
       कानुर खुर्द जंगल सर्व्हे नं. 121 मध्ये वनअधिकारी व वनकर्मचारी फिरत असताना जंगली प्रजातीचे 121 चोरतोड बुडे आढळून आले. त्यापासून तयार केलेला जळावु लाकुड माल, ट्रॅक्टर क्र. एम. एच. 09, सी. जे. 6811 व ट्रॅली नं. एम. एच. 09 ए. एल 1995 मध्ये भरत असताना प्रल्हाद ज्ञानदेव गावडे, मोहन पांडुरंग गावडे. संतोष ज्ञानदेव गावडे, रामचंद्र चंद्रकांत गावडे, अंकुश भिकाजी कांबळे, रोहन परशुराम असोलकर, रविंद्र विनोद गावडे, गिरिष बाबुराव गावडे, संतोष अर्जुन बिर्जे (सर्वजण रा. कानुर खुर्द, ता. चंदगड) यांना जळावू लाकूड 8.16 घनमीटर ट्रॅलीमध्ये भरतेवेळी जागेवर पकडले. याकामी प्र. गु. रि. नं. सीटी-03/2020 चा नोंद केला आहे. याकामी वनपाल ए. डी. वाजे यांनी ट्रॅक्टर व ट्रॅली मधील जळावु लाकडा सहीत माल जप्त करुन वाहन मालक यशवंत गोविंद बिर्जे यांच्यासह दहा जणांच्यावर भारतीय वन अधिनिमय 1927 चे कलम 26(1) व 41 (2) ब चे उल्लंघन केल्याप्रकरणी कार्यवाही केली आहे. 
सदर गुन्ह्याचा तपास उपवनसंरक्षक कोल्हापूर एच. जी. धुमाळ, सहाय्यक वनसंरक्षक वन्यजीव संदेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगडचे वनक्षेत्रपाल डी. जी. राक्षे, वनपाल ए. डी. वाजे, डी. जी. पाटील, बी. आर. निकम, वनरक्षक श्रीमती के. एस. पताडे, एस. ए. पोवार, ए. डी. सांगळे, के. आर. सानप, वनमजूर के. बी. पोवार, रमेश कोकितकर, अंकुश गावडे, रामा मुळीक, अशोक सावंत, शंकर सुकये यांच्यामार्फत सुरू आहे.No comments:

Post a Comment