तुर्केवाडी येथे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत रास्त धान्य केंद्रावर गल्लीनिहाय मोफत वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

15 April 2020

तुर्केवाडी येथे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत रास्त धान्य केंद्रावर गल्लीनिहाय मोफत वाटप

तुर्केवाडी येथे रास्त धान्य दुकानावर मोफत धान्य वाटप करण्यात आले. 
तुर्केवाडी / प्रतिनिधी
कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप सुरू झाले असून मंगळवारपासून तुर्केवाडी रास्तभाव केंद्रावर त्याचे वितरण करण्यात येत असल्याची माहिती केंद्रचालक शंकर पाटील यांनी दिली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना लागणारे खत आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत चालू असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
या योजनेत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना नियमित अन्नधान्या व्यतिरिक्त प्रति सदस्य प्रति महिना ५ किलो तांदुळ मोफत देण्याबाबत शासनाकडून आदेश प्राप्त झाले आहेत. संबंधित लाभार्थ्यांनी कोरोना प्रादर्भावाच्या धर्तीवर रास्तभाव दुकानांमध्ये गर्दी न करता एक मीटर अंतर ठेवत धान्य घ्यावे असे तलाठी ठोसरे यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागासाठी एप्रिल, मे व जून २०२० साठी अन्नधान्याच्या दिलेल्या नियमित नियमानुसार अन्नधान्याचे वाटप विहित दराने त्या-त्या महिन्यात करण्यात येणार आहे. त्यानुसार एप्रिल २०२० करीता अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका धारकांकरीता २३ किलो गहु व १२ किलो तांदुळ आणि मे व जून २०२० या महिन्यांकरीता अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका धारकांकरीता २५ किलो गहु व १० किलो तांदुळ प्रत्येक शिधापत्रिकेवर त्या-त्या महिन्यांमध्ये देण्यात येणार आहे.
तसेच प्राधान्य कुटुंब योजनेतील प्रति लाभार्थ्यांकरीता दरमहा ३ किलो गहु व २ किलो तांदुळ देण्यात येणार आहे. सदर गव्हाची किंमत २ रुपये प्रति किलो तर तांदुळ ३ रुपये प्रति किलो आहे. एप्रिल, मे व जुन २०२० साठी अन्नधान्याच्या दिलेल्या नियमित नियतनानुसार विहित दराने अन्नधान्य वितरण झाल्यानंतरच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या मोफत तांदळाचे वाटप प्रति सदस्य प्रति महा ५ किलो याप्रमाणे प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जुन २०२० महिन्यात करण्यात येणार आहे. संबंधित लाभार्थ्यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या धर्तीवर रास्तभाव दुकानांमध्ये गर्दी न करता एक मीटर अंतर ठेवत धान्य घ्यावे. तरी पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तुर्केवाडीचे तलाठी ठोसरे यांनी केले.
तुर्केवाडी रास्तभाव वितरण केंद्राअंतर्गत तुर्केवाडी, जंगमहट्टी, सुपे या गावातील नागरिकांना धान्य वाटप करण्यात येते. तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाच्यावतीने खबरदारीचे उपाय आखण्यात आले आहेत. सोशल डिस्टनसिंग राखले जावं यासाठी तिन्ही गावांना वेगवेगळ्या दिवशी धान्य पुरवठा करण्यात येणार आहे. आजपासून (मंगळवार) पुढील चार दिवस तुर्केवाडीत गल्लीनुसार वाटप सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जंगमहट्टी आणि सुपे गावातील सारपंचांशी चर्चा करून वाटपाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे तलाठी श्री. ठोसरे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment