दुचाकीवरुन दोघांना बंदी : चारचाकीमधून दोघांचाच प्रवास - जिल्हाधिकारी दौलत देसाई - चंदगड लाईव्ह न्युज

19 April 2020

दुचाकीवरुन दोघांना बंदी : चारचाकीमधून दोघांचाच प्रवास - जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर / प्रतिनिधी
संचारबंदीच्या कालावधीत सामाजिक अंतर राखण्यासाठी दुचाकीवरुन दोघांना फिरण्यास बंदी आहे. चारचाकीमधूनही चालवणारी एक व्यक्ती आणि पाठीमागे एक अशा दोघांनीच प्रवास करावा. याचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिला.
            जिल्ह्यामध्ये आज एक नवीन रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील नसून मुंबईमधील सांताक्रूझ येथील रहिवाशी आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले,  दि. 16 एप्रिल रोजी एका मोठ्या कंटेनरमधून जवळपास 30 लोकं बेकायदेशीररित्या मुंबईहून कर्नाटककडे चालले होते. त्यांना किणी टोलनाक्याजवळ पोलीसांनी अडवून सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते.  आज कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला रुग्ण हा यामधील आहे. बाकीचे 10 अहवाल हे निगेटिव्ह असून यातील अद्यापही 18 जणांचा अहवाल येणे बाकी आहे. या सर्व व्यक्ती कर्नाटकमधील हसन आणि त्या परिसरातील आहेत.
            बेकायदेशीर प्रवास करत असताना या सर्वांना अडवलं त्यामुळे कर्नाटकात होणारा संसर्ग थांबवला आहे. तपासणी न करता हे सर्वजण कर्नाटकात गेले असते तर मोठा प्रसार झाला असता. तो जिल्हा प्रशासनाने थांबवला आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, राज्य शासनाने  उद्यापासून उद्योगधंदे, व्यवसाय तसेच कार्यालये काही प्रमाणात सुरु करण्याबाबत निर्देश दिले आहेत. याबाबत जिल्हा प्रशासन स्वतंत्रपणे निर्णय घेत आहे. कोणत्या अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यायची, किती कामगारांची, किती कार्यालयातील कर्मचाऱ्यांना परवानगी द्यायची याबाबत आज सायंकाळपर्यंत सविस्तर धोरण जाहीर करण्यात येईल.
            मंत्रालय तसेच इतर शासकीय कार्यालयामधील काही कर्मचारी आप आपल्या गावामध्ये आले आहेत. अशा कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या मूळ कार्यालयात हजर व्हायचे असेल तर त्याची परवानगीही संबंधित तहसिलदार कार्यालयाकडून मिळेल.संचारबंदीमध्ये अत्यावश्यक तसेच जीवनावश्यक बाबींसाठी नजिकच्या ठिकाणी जाण्यासाठी दुचाकी तसेच चारचाकीमधील प्रवासाला सूट देण्यात आली आहे. परंतु असे निदर्शनास येत आहे, दुचाकीवर चालवणारा आणि त्याच्या पाठीमागे दुसरी व्यक्ती आढळून येत आहे. राज्य शासनाच्या सूचनेनसुार अशा दुचाकीवर दोघांना प्रवास करण्यास पूर्णत: बंदी घातली आहे. अत्यावश्यक कारणाने चारचाकीचा वापर करताना चालवणारी व्यक्ती आणि पाठीमागील सीटवर बसणारी एक व्यक्ती अशा दोनच व्यक्ती बसून चारचाकी वापरु शकतात. याचं उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे पोलीसांना देण्यात आले आहेत.


No comments:

Post a Comment