बाहेरून कोवाडमध्ये येणाऱ्यांना रोखण्यासाठी गावातील माजी सैनिकांचा खडा पहारा - चंदगड लाईव्ह न्युज

19 April 2020

बाहेरून कोवाडमध्ये येणाऱ्यांना रोखण्यासाठी गावातील माजी सैनिकांचा खडा पहारा

कोवाड ( ता. चंदगड ) येथे माजी सैनिकानी अशा प्रकारे कडक बंदोबस्त ठेवला आहे.
कोवाड / प्रतिनिधी
        सध्या सर्वत्र संचारबंदीचा कालावधी हा 3 मे पर्यंत वाढविला आहे.चंदगड तालुक्याला लागून असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील वाढत्या रुग्ण संख्येचा आकडा लक्षात घेता चंदगड तालुक्यातील सीमा भागातील गावानी भलतीच धास्ती घेतली आहे.कोरोनाचा  फ़ैलाव रोखण्यासाठी विविध उपाय योजले जात असून कोवाड ( ता. चंदगड ) येथे बाहेरून येणाऱ्यांना रोखण्यासाठी अहोरात्र माजी सैनिकानी फिल्डींग लावली आहे .
        सर्वच गावानी आपल्या  गावच्या सीमा  बंदिस्त केल्या आहेत.तालुक्याच्या सिमेपासून  अवघ्या ३ किलो मीटर वर बेळगुंदी या ठिकाणी एक रुग्ण सापडल्यामुळे चंदगड चे तहसीलदार  विनोद रणावरे यांनी 19 गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.मागील तीन दिवसात बेळगाव जिल्ह्यात 22 रुग्णाची भर पडल्यामुळे अत्यावश्यक सेवासहित सर्व  वाहतूक  बंद करण्याचे आदेश प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी दिले असून कर्नाटकाच्या सीमेला लागून असणाऱ्या गावांची धाकधूक मात्र भलतीच वाढली आहे.
        कर्यात भागातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या कोवाड या ठिकाणी मात्र बँक,मेडिकल्स,आणि किराणा साहित्य यासारखी कारणे देत  आजूबाजूच्या गावातील लोकांची रेलचेल अजूनही चालूच आहे.बाजारपेठमधील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर जि. प.सदस्य कल्लापा भोगण यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोना पासून गावाला दूर ठेवण्यासाठी गावातील माजी सैनिकांनी संपूर्ण बाजारपेठेत पहारा देण्याचे काम चालू केले आहे.आलेल्या व्यक्तींची चौकशी करून त्यांना मास्क वापरण्याबाबत  सूचना करून गावात प्रवेश  दिला जात आहे.यामध्ये एकनाथ सुर्वे, नागोजी धर्मोजी, शिवाजी कुट्रे, पुंडलिक पाटील, रामचंद्र व्हन्याळकर, मुरारी सुर्वे, गोविंद आडाव हे माजी सैनिक पहारा देत असून त्यांच्या या कामात सरपंच यांच्यासह उपसरपंच आणि ग्रामस्तरीय कमिटीचे सहकार्य मिळत आहे.

No comments:

Post a Comment