चंदगडचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांच्या विरोधात चंदगड पोलिसात तक्रार - चंदगड लाईव्ह न्युज

23 April 2020

चंदगडचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांच्या विरोधात चंदगड पोलिसात तक्रार

चंदगड / प्रतिनिधी
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात सद्या कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. याच बेळगाव शहरात वास्तव्याला असलेले चंदगडचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी संचारबंदी काळात नियमांचे उल्लंघन करत चंदगड येथे शिवभोजन थाळी या केंद्राचे उद्घाटन केले. या उद्घाटनाचे फोटो समाजमाध्यमांवर टाकले. बंदी आदेशाचे उल्लंघन करून सरकारने करोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्याकरिता दिलेल्या सूचना व अटींचे भंग करून मानवी जीवन व स्वास्थ तसेच वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात येईल असे कृत्य केले. त्यामुळे या विरोधात नांदवडे (ता. चंदगड) येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड. संतोष मळविकर यांनी चंदगड पोलिसात तक्रार दिली आहे. मात्र अद्याप पोलिसांत गुन्हा नोंद नाही. 
देशासह राज्यात दिवसेनदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव होवू नये, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजनासह जनजागृती केली जात आहे. 19-03-2020 रोजी कोरोना विषाणुचा कोव्हीड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू असून खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार करोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखणेकरीता कोल्हापूर जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेतील वाहने तसेच वाहतुकीस बंदी आहे. त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, प्रार्थनास्थळे, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच वेगवेगळी उद्घाटने यावरही बंदी आहे. याबाबत जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनीही जीवनावश्यक वस्तुसह सर्व प्रकारची वाहने बंद करण्याचा आदेश दिला आहे. कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तरीही 20 एप्रिल 2020 रोजी आमदार राजेश पाटील यांनी बेळगावहून चंदगडमध्ये येवून चंदगड येथील शासकीय गोडाऊनसमोर असलेल्या इमारतीमध्ये शिवभोजन थाळीच्या केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी नगराध्यक्ष व इतर किमान 30 ते 35 लोकांना एकत्र करुन कार्यक्रम केला. या कार्यक्रमाचे फोटो समाजमाध्यमावर प्रसारीत केले. त्यामुळे समाजामध्ये लॉकडाऊन विषयीची भीती व सरकारी आदेशाबद्दल चुकीचा संदेश जनतेमध्ये गेला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात 3 मे 2020 पर्यंत बंदी आदेश लागू असताना सुद्धा त्यांनी बंदी आदेशाचे उल्लंघन करून सरकारने करोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्याकरिता दिलेल्या सूचना व अटींचे भंग करून मानवी जीवन व स्वास्थ तसेच वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात येईल असे कृत्य केले आहे. त्यामुळे या विरोधात ॲड. संतोष मळविकर यांनी चंदगड पोलिसात तक्रार दिली आहे. दरम्यान या संदर्भात आमदार राजेश पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होवू शकला नाही.

ॲड. संतोष मळविकर यांचा तक्रारी अर्ज घेतलेला आहे. सद्या संचारबंदी काळामध्ये सार्वजनिक कार्यक्रमा संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार तहसिलदार यांना आहे. तहसिल कार्यालयाकडून हा कार्यक्रम अनाधिकृत होता. अशी सुचना आल्यास आम्ही गुन्हा नोंद करु असे पोलिस निरिक्षक अशोक सातपुते यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment