चंदगड तालुक्यात शेवटच्या टप्यात सोशल डिस्टंन्सकडे दुर्लक्ष, रेशन दुकान व बँकांसमोर गर्दी - चंदगड लाईव्ह न्युज

13 April 2020

चंदगड तालुक्यात शेवटच्या टप्यात सोशल डिस्टंन्सकडे दुर्लक्ष, रेशन दुकान व बँकांसमोर गर्दी

बँकेसमोर गर्दी केल्याने रांगेत सोशल डिस्टन्सकडे दुर्लक्ष होत आहे. 
तेऊरवाडी / प्रतिनिधी 
    संपूर्ण देशात जमावबंदी असतानादेखील चंदगड तालुक्यातील कोवाड, पाटणे फाटा, हलकर्णी आणि चंदगड या तालुक्याच्या काही भागात नागरिक अजूनही फिरताना दिसत आहेत. आज अनेक बँकासमोर गर्दी दिसून आली. तर अशा बँका व रेशन दुकानाबाहेर सोशल डिस्टन्सचा बट्याबोळ झालेला दिसून आला.
      लॉक डाऊन जाहिर झाल्यापासून चंदगड तालूक्यात संपूर्ण गावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे लॉक डाऊनचे बंधन पालन करण्यात आले. प्रशासनानेही यावर चांगली उपाययोजना केली होती . पण आजपासून अनेक ठिकाणी अचानकपणे मोठया संख्येने लोक कोवाड, अडकूर, चंदगड अशा ठिकाणी असणाऱ्या बँकासमोर येऊन  गर्दी केली. तर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दूचाकी वाहने धावू लागली आहेत. या सर्वावर त्वरीत निर्बंध घालणे गरजेचे आहे. 
बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना या कोरोना आजाराचं अजिबात गांभीर्य दिसून येत नाही. घरी दिवसभर बसून बसून खूप कंटाळा आला आहे म्हणून काही सज्ञान व प्रतिष्ठित मंडळी ही प्रशासनाने एवढी कडक कारवाई करून सुद्धा घरी बसण्याऐवजी बाहेर फिरताना दिसत आहेत. तीन आठवडे झाले लाॅकडाऊन जाहीर होऊन.तशी कोरोनाग्रस्तांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्हा प्रशासन,राज्य प्रशासन आणि देशाच्या प्रशासनानेही रोज सूचना देऊन सुद्धा काही नागरिक आणि तरुण मुले "आम्हाला काय होतंय. इकडे कुठे कोरोना येतोय ."या भ्रमातच आहेत त्यांना अजिबात काळजी नाही. नक्कीच ग्रामीण भागात पोलीस प्रशासनाची संख्या अत्यंत कमी आहे. अनेक मोठ्या मोठ्या गावात कमिट्याही स्थापन केल्या आहेत. त्यांच्याद्वारे करडी नजर ठेवली जात आहे. परंतु काही बेफिकीर नागरिक बिनधास्त बाहेरच फिरताना दिसत आहेत. ते ही तोंडावर मास्क न लावताच. यावर आता प्रतिष्ठित नागरिक, स्थानिक प्रशासन व्यवस्था यांनी लक्ष घालून तातडीने यावर कारवाई करण्यात यावी. ग्रामीण भागातील मुख्य रस्ते जरी बंद असले तरी अंतर्गत रहदारी ही सायंकाळच्या वेळी वाढताना दिसत आहे. साहजिकच स्थानिक पातळीवर प्रशासनाला ताण वाढत आहे. टी.व्ही. वर अनेक प्रसिद्धी माध्यमातून विनंती करत आहेत की नागरिकांनी घरीच सुरक्षित थांबावे. आपल्या कुटुंबाबरोबर सहवास घ्यावा.आरोग्याबद्दल, स्वच्छतेबद्दल  प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे योग्य पालन करून आपली काळजी घ्यावी.अजूनही वेळ गेलेली नाही. आपणास विनंती आहे की घरीच सुरक्षित राहून कोरोना विषाणूला बाहेरच हद्दपार करूया.

No comments:

Post a Comment