कोरोनासंदर्भात प्रक्षोभक माहिती प्रसारित केल्यास कारवाई, संचारबंदीचे पालन करण्याचे चंदगड पोलिसांचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

09 April 2020

कोरोनासंदर्भात प्रक्षोभक माहिती प्रसारित केल्यास कारवाई, संचारबंदीचे पालन करण्याचे चंदगड पोलिसांचे आवाहन


दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
          कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामस्थांनी संचारबंदीचे काटेकोर पालन करावे. कोरोनाच्या प्रसारासंदर्भात कोणत्याही अफवांवर ग्रामस्थांनी विश्वास ठेवू नये. तसेच खोटी व प्रक्षोभक माहिती प्रसारित करु नये.  अन्यथा त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई हाती घेण्यात येईल असे चंदगड पोलिस ठाण्याच्या वतीने सांगण्यात आले आहे. चंदगडचे पोलिस निरिक्षक ए. एन. सातपुते यांच्या सुचनेवरून बुधवारी तुर्केवाडी गावातील संचारबंदीची पाहणी करण्यासाठी हेड कॉन्स्टेबल श्री. मकानदार व त्यांच्या सहकार्यांनी भेट दिली. त्यावेळी मकानदार यांनी संचारबंदीचे ग्रामस्थांनी पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी पोलिस पाटील माधुरी कांबळे  व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासमवेत गावातील एकूणच परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
                 कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तालुक्यात संचारबंदी लागु करण्यात आली आहे. दरम्यान, अनेक गावांमध्ये कोरोनासंदर्भात जनजागृतीही केली जात आहे. त्याच अनुषंगाने चंदगड पोलिसांच्या वतीने संचारबंदीचे पालन करण्यात यावे असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, अनेक गावांमध्ये कोरोनासंदर्भात अफवा पसरवण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी भेटी देत कोरोनाच्या फैलावासंदर्भात कोणतीही खोटी व प्रक्षोभक माहिती अथवा अफवा पसरवू नये अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. यादसंदर्भाने बुधवारी तुर्केवाडी गावामध्ये पोलिसांनी संचारबंदीची पाहणी केली.
              कोरोना विषाणू हा कोणत्याही जाती किंवा धर्मापुरता मर्यादीत नसून एका व्यक्तीद्वारे अनेकांमध्ये या विषाणूचा फैलाव होत आहे. यामुळे सर्वांनीच खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. सुरक्षित अंतर ठेवण्याबरोबरच सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करून कोरोना विषाणूंचा फैलाव रोखण्याचे काम सर्वांनीच करावे आणि प्रशासनास सहकार्य करावे, अशी सुचना पोलिसांनी केली. तालुक्यातील सर्व डॉक्टर्स, आरोग्य खात्याचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस खाते यांच्यावतीने दिवसरात्र कार्य सुरू आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्याच्यादृष्टीने या सर्वांचीच धडपड सुरू आहे. यामुळे त्यांच्या सेवेची दखल घेऊन त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे. त्यांच्याशी सौहार्दतेने वागणेही आवश्यक आहे. घरामध्येच राहून विषाणूचा फैलाव रोखण्याबाबत जागृती करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

No comments:

Post a Comment