महिपाळगड परिसरात कोल्ह्याच्या हल्यात हुंदळेवाडी येथील शेतकरी जखमी - चंदगड लाईव्ह न्युज

03 April 2020

महिपाळगड परिसरात कोल्ह्याच्या हल्यात हुंदळेवाडी येथील शेतकरी जखमी

रघुनाथ देसाई
कालकुंद्री / प्रतिनिधी
महिपाळगड (ता. चंदगड) येथील परिसरात एका कोल्हयाने हुंदळेवाडी (ता. चंदगड) येथील शेतकरी रघुनाथ चिंटू देसाई (वय-७५) यांच्यावर  `वारी` नावाच्या शेतात हल्ला करून गंभीर जखमी केले. सुमारे पंधरा मिनिटाच्या झटापटीत देसाई यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी ओरबडल्याच्या खुणा असून काही ठिकाणी चावाही घेतला आहे. कोवाड येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध नसल्याने त्यांना गडहिंग्लज येथे उपजिल्हा रुग्णांलयात दाखल करण्यात आले होते. 
चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील कर्नाटक सीमेलगत वैजनाथ डोंगररांगा, किल्ले महिपाळगड तसेच आजूबाजूच्या गावातील शिवारात नेहमीच वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सुरू असतो. राजरोस अनेक पिकांची नासधूस होत असते. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वन्यप्राणी व शेतकरी यांच्यात संघर्ष सुरू आहे.  होसूर, कौलगे, बुक्कीहाळ, सुंडी, करेकुंडी सह कर्नाटकातील बेकिनकेरे, अतिवाड परिसरात मधल्या काळात एका तरसाची दहशत निर्माण झाली होती. सद्या या शिवारात कोल्ह्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. काही दिवसापूर्वी अशाच एका कोल्ह्याने नागरदळे येथील एका म्हैशीवर हल्ला केला यात शेतकरीही जखमी झाला आहे. त्यामुळे परिसरातील पशुधन धारक शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. वनविभागाने पिसाळलेला कोल्हा व वन्यप्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा व जखमींना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे. 
रघुनाथ देसाई यांची प्रकृती स्थिर असून ते सद्या आपल्या घरी आहेत. त्यांना सरकारी नियमाप्रमाणे नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे वनपाल श्री. शिंदे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment