चंदगड / प्रतिनिधी
लॉकडाउनच्या काळातही केवळ अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल व डिझेलचा पुरवठा करावा अशा सुचना आहेत. त्यानुसार सुरक्षित वावर ठेवून हि सेवा पंपचालकांकडून दिली जात आहे. मात्र पंपावर आलेला प्रत्येक व्यक्ती पेट्रोलची मागणी करत असून पेट्रोल मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत आहेत. त्यामुळे पंपावरील कर्मचाऱ्यांना रोज अनेक वादाच्या प्रसंगाना तोंड द्यावे लागत आहे. पोलिसांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी पेट्रोल पंप चालक व कर्मचाऱ्यांतून होत आहे.
कोवाड येथे दोन पेट्रोलपंप आहेत. दोन्ही पंपावरुन वाहनधारकांची चौकशी करुन व अत्यावश्यक सेवेचे आयकार्ड पाहून पेट्रोल व डिझेल दिले जाते. ज्या वाहनाना पेट्रोल दिले आहे. त्यांच्या नोंदीही ठेवल्या जात आहेत. पण येथील दोन्ही पंपावरुन सध्या पेट्रोलसाठी लोकांची दररोज गर्दी होत आहे. संचारबंदी असतानाही मोठ्या संख्येने वाहनधारक घराबाहेर पडत आहेत. पोलिसांचा वचक नसल्याने बिनधास्त वाहनधारक रस्त्यावरुन फिरत आहेत. यामुळे पेट्रोलची मागणी वाढली आहे. पंपावरुन सकाळी व संध्याकळाच्या सत्रात पंपाच्या बाहेर वाहनांची गर्दी होत आहे. पण अत्यावश्यक सेवांशिवाय पेट्रोल दिले जात नसल्याने वाहनधारक पंपांवरील कर्मचाऱ्यांशी उर्मट वर्तन करत आहेत. वादाचे प्रसंग घडत असल्याने पंपचालकानी पोलिसांत धाव घेतली आहे. पण पोलिसांच्याकडूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने पंपचालक वैतागले आहे. त्यामुळे अशा परिस्थिती काम कसे करावे असा प्रश्न पंपचालकांनी केला आहे.
No comments:
Post a Comment